लंडन : विजयी पथावर परतलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज गुरुवारी ‘जायंट किलर’ आयर्लंडला नमवून ४४ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याची आशा आहे. भारताने काल इटलीवर ३-० ने विजय मिळविला होता. आयर्लंडवर विजय मिळाल्यास भारतीय संघ दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत दाखल होईल.१९७४ साली फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली; पण चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. अर्जेंटिनाच्या सेसारियो येथे झालेल्या मागच्या विश्वचषकात भारत आठव्या स्थानावर राहिला.आयर्लंडने मागच्या दोन सामन्यांत भारताचा पराभव केला असल्यामुळे मानसिकदृष्ट्या त्यांचे पारडे जड आहे. ब गटात भारत आणि अमेरिका यांचा समावेश असताना आयर्लंडने अव्वल स्थान पटकविले होते.आयर्लंडने येथे भारताला साखळीत नमविण्याआधी जोहान्सबर्ग येथेही मागच्या वर्षी हॉकी विश्व लीगच्या उपांत्य फेरीत २-१ ने नमविले होते. जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानावर असलेल्या या संघाने अमेरिकेला ३-१ ने आणि भारताला ०-१ ने नमवून आधीच ऐतिहासिक कामगिरी केली आहे.भारताने एकमेव विजय क्रॉसओव्हर सामन्यात इटलीवर नोंदविला. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. गोलकीपर सविताने आतापर्यंत शानदार कामगिरी केली असून, आक्रमक फळीनेदेखील सांघिक बळ सिद्ध केले आहे. दरम्यान, दुसºया उपांत्यपूर्व सामन्यात हॉलंडची गाठ इंग्लंडविरुद्ध पडणार आहे. (वृत्तसंस्था)इटलीविरुद्ध गोल नोंदविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. ही लय पुढेही कायम राहील. आमचे लक्ष्य उपांत्य फेरी असल्याने आयर्लंडवर विजय नोंदविण्यासाठी सर्वशक्तीनिशी खेळणार आहोत.- राणी रामपाल, कर्णधार.
महिला हॉकी विश्वचषक : भारताचे लक्ष्य उपांत्य फेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 3:57 AM