भुवनेश्वर : सामनावीर सॅम्युअल वॉर्डच्या दोन गोलमुळे इंग्लंडने शनिवारी विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीतील सामन्यात ब गटात भारतावर ३-२ गोलने विजय नोंदविला. काल पहिल्या सामन्यात जर्मनीकडून ०-२ असा पराभव पत्करणा-या इंग्लिश खेळाडूंनी भारतावर वर्चस्व गाजविले. इंग्लंडचा हा पहिला विजय होता. भारताने काल आॅस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर इंग्लंडविरुद्ध विजयाची आशा होती.तथापि, सामन्यात अनेक चुका करीत गोल नोंदविण्याची संधी भारतीय खेळाडूंच्या तुलनेत इंग्लंडने सरस खेळ केला. २५ व्या मिनिटाला डेव्हिड गुडफिल्ड याने गोल नोंदवित इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. सूरज करकेराच्या पायाला लागून मागे आलेला चेंडू डेव्हिडने अलगद गोलजाळीत ढकलला.४३ व्या मिनिटाला भारतीय कर्णधार हरमनप्रितसिंग याने केलेल्या चुकीचा लाभ घेत इंग्लंडने आघाडी दुप्पट केली होती. डीच्या आत उसळी घेणाºया चेंडूवर नियंत्रण मिळविण्यात हरमनप्रित अपयशी ठरताच वॉर्डने त्यावर गोल केला. दोन मिनिटांनंतर आकाशदीपने भारतासाठी पहिला गोल केला. ५० व्या मिनिटाला रुपिंदरपालसिंग याने गोल नोंदवित सामन्यात २-२ अशी बरोबरी साधून दिली होती. तथापि, ५६ व्या मिनिटाला सॅम्युअल वॉर्ड याने स्वत:चा दुसरा गोल नोंदविताच इंग्लंडच्या गोटात आनंद साजरा झाला. तत्पूर्वी बेल्जियम आणि स्पेन संघाने अ गटाच्या सामन्यात सनसनाटी विजय नोंदविले. बेल्जियमने रिओ आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला ३-२ ने आणि स्पेनने विश्वचषकाचा रौप्यविजेता नेदरलँडचा ३-२ ने पराभव केला. बेल्जियमने अर्जेंेिटनाकडून रिओ आॅलिम्पिकच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढला. या सामन्यात अखेरच्या १० मिनिटांत ४ गोल झाले. आता स्पेनचा सामना अर्जेंटिनाविरुद्ध व बेल्जियमचा सामना नेदरलँडविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)
विश्व हॉकी लीग : भारत इंग्लंडकडून पराभूत; स्पेन, बेल्जियम संघांचे सनसनाटी विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 3:25 AM