मुंबई : वाहतूक, नागरी सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांपासून खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे शहर असा मुंबईचा दमदार प्रवास २०२४-२५ पर्यंत झालेला दिसेल, असा विश्वास मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह २०२१ मध्ये बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी विविध प्रकल्पांचा लेखाजोखा मांडला.
चहल म्हणाले की, महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प डिसेंबर २०२३ च्या एक-दोन महिने आधीच सुरू होईल. गेल्या १३ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. १३ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प मुंबई महापालिका स्वत:च्या खर्चाने करत आहे. दोन्ही बोगद्यांची कामे डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होतील. हा केवळ रस्ताच नसेल तर त्याच्या खाली १७५ हेक्टर परिसरात जागतिक दर्जाची विविध उद्याने असतील. पार्किंगच्या सोई असतील.
मुंबई महापालिकेने १५ हजार कोटी रुपये खर्चाचे मलनिस्सारण प्रकल्प हाती घेतले आहेत. वैतरणा धरणावर ८० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठीचे कार्यादेश अलीकडेच दिले आहेत. २० मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प करीत आहोत. समुद्रातील पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर केले जाणार असून १८०० एमएलडी पाण्याचे रूपांतर करण्याचा पहिला टप्पा २०२४ पर्यंत पूर्ण होईल. मुलुंड-गोरेगावला जोडणारा ६६६० कोटी रुपये खर्चाचा बोगदा तयार करण्यासाठीचे कार्यादेश एक महिन्यात दिले जातील. जिजामाता उद्यान अद्ययावत करण्यासाठी १५० कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. येत्या १८ महिन्यांत ते काम पूर्ण होईल. अशी माहितीही चहल यांनी दिली.
मुंबईतील उड्डाणपूल अद्ययावत केले जात आहेत. पुलांखाली हॉकी, फुटबॉलची मैदाने, जॉगिंग पार्क असतील. वरळी डेअरीच्या जागेवर सहा एकरात जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणार असून, ही गुंतवणूक हजार कोटींची असेल. - आय. एस. चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका