मुंबई – शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना वाहतूक कोडींचा प्रचंड मोठा सामना करावा लागतो. उपनगरातून दक्षिण मुंबईपर्यंत जाण्यासाठी ३-४ तास अडकून राहावं लागतं. या वाहतूक कोडींतून मुंबईकरांची सुटका व्हावी मुंबई महापालिका कोस्टल रोडसारखा ड्रीम प्रोजेक्ट तयार करत आहे. या कोस्टल रोडचं काम प्रगतीपथावर असून पुढील २ वर्षात हा रस्ता सुरु होईल असा विश्वास मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल. मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतूक कोंडीला घाबरतात. मात्र ही कनेक्टिविटी सुरु झाली तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील असं त्यांनी सांगितले. त्यामुळे डिसेंबर २०२३ पासून मुंबईकरांची वाहतूक कोडींतून सुटका होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ४० टक्क्याहून अधिक पूर्ण झाले आहे, तर मलबार हिल येथे समुद्राखालून जाणाऱ्या देशातील पहिल्या महाबोगद्याचे एक किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ९०० मीटरपर्यंतचे काम सुरू आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा १०.५८ किलोमीटरचा कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. या मार्गात चार अधिक चार लेनसह भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून २,३०० टन वजनाचे महाकाय टनेल बोअरिंग मशीन गेल्या वर्षी मुंबईत आणण्यात आले. मलबार हिलच्या खालून हे बोगदे जाणार आहेत. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ११ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. टनेल बोरिंग मशीन या संयंत्राद्वारे हे काम सुरू आहे. त्यानुसार जमिनीच्या खाली १० ते ७० मीटर हे बोगदे असणार आहेत. प्रत्येक बोगद्याची लांबी २.०७ किलोमीटर असेल. यासाठी दररोज तीन सत्रांमध्ये काम सुरू आहे.
कोस्टल रोडमुळे होणारे फायदे
कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तसेच वेळेची ७० टक्के आणि इंधनाची ३४ टक्के बचत होणार आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल
या प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाईल टेक्नॉलाजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे कोस्टल रोडचा भाग असणाऱ्या पुलांखाली १७६ खांब उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पासाठी १२ हजार ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच भराव टाकलेल्या जमिनीवर १२५ एकरचे उद्यान बहरणार आहे. १,८५२ वाहने उभी करणे शक्य असलेले भूमिगत वाहनतळही तयार केले जाणार आहे.