मुंबई – कोविडसारखी महामारीही महाराष्ट्राला थांबवू शकली नाही. महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्रात ५ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून ९ हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या दीड वर्षात आम्ही महाराष्ट्रात ९६ गुंतवणूकदार आले असून १ लाख ८३ हजार कोटींची गुंतवणूक केली. त्यातून ३ लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी राज्याला प्राप्त होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) म्हणाले.
सुभाष देसाई म्हणाले की, पुढच्या २ वर्षात ५ लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार आहोत. आमचे विरोधी पक्षनेते बोलतात महाराष्ट्रातील रोजगार इतर राज्यात पळवले जातायेत असा आरोप करतात, पण आम्ही इतर राज्यांमध्ये उद्योग आणण्यासाठी जात नाही. आम्ही परदेशात जाऊन विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणतो ही आमची ताकद आहे अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता टोला लगावला. त्याचसोबत MIDC ची तुलना देशातील कुठल्याही महामंडळाशी करत नाही. महाराष्ट्राची तुलना जगातील इतर देशांशी होत आहे. देशात इतर राज्यांना महाराष्ट्राने कधीच मागे टाकलं आहे. राज्यात ५ आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत. दोन मोठी बंदरं, ५३ छोटी बंदरं आहेत. अर्धे परदेशी पर्यटक महाराष्ट्रात उतरतात मग गुंतवणूकही महाराष्ट्रातच येईल असं त्यांनी सांगितले.
तसेच, रस्त्यावरुन, रेल्वेतून, विमानातून, बंदरातून अशा चारही मार्गातून महाराष्ट्राचा विकास होत आहे. त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यावर महाराष्ट्र सरकारचा भर आहे. जी संस्कृती रोजगार देते तीच टिकते. रोजगार वाढवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करतो. दिंडोरी बायोटेक्नॉलॉजी प्रकल्प आणतो. रांजणगाव, तळेगावला इलेक्ट्रिक पार्क उभं करतोय. महाराष्ट्रात ३७ एसीझेड कार्यान्वित आहेत. इलेक्ट्रिक व्हेहिकल पॉलिसी उत्कृष्ट आहे. तीन विभागांनी मिळून हे धोरण आखलं आहे. चार्जिंग इन्फ्रोस्क्चट्ररचं जाळं उभारावं लागणार आहे असंही सुभाष देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या उद्योगांमुळे सामान डिलिव्हरी क्षेत्राला चालना मिळाली आहे. MMR रिजन, नागपूर याठिकाणी महाराष्ट्र सरकार गोदामं उभारणार आहे. ज्यामुळे या कंपन्यांना सामान ठेवण्यासाठी आणि तेथून इतरत्र घरपोच करण्यासाठी फायदा होणार आहे. राज्यातील ३५ लाख तरुण माहिती तंत्रज्ञानात काम करतायेत. आम्हाला ही संख्या ५० लाखांपर्यंत करायची आहे. माहिती तंत्रज्ञानाचं सर्वोकृष्ट धोरण महाराष्ट्रात विकसित होत आहे. पायाभूत, औद्योगिक विकास हातात हात घालून चालत असल्याने राज्याचा विकास होत आहे असंही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.