मुंबई : रस्ते एकमेकांसाठी जोडले जातात तेव्हा विकासाची दालने उघडली जातात. या विकासासाठी पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. देशाच्या १४ टक्के जीडीपीचा भार एकटा महाराष्ट्र उचलतो. त्यामुळेच महाराष्ट्राला आर्थिक पॉवर हाउस म्हटले जाते. आधुनिक भारतासाठी महाराष्ट्राची वाटचाल महत्त्वाची असल्याचे मत लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह २०२१ च्या प्रास्ताविकात दर्डा म्हणाले, फक्त बातम्या देणे, टीकाटिप्पणी करणे एवढेच ‘लोकमत’चे काम नाही. तर, विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते करणे व चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे महत्त्वाचे आहे. यासाठीच अशा उपक्रमांचे आयोजन लोकमत करत असते. पायाभूत विकासात महाराष्ट्राची वाटचाल महत्त्वाची आहे. समृद्धी महामार्ग, ट्रान्स हार्बर, मेट्रो, स्मार्ट सिटी, सिडकोचे नैना प्रोजेक्ट असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. कामात दर्जा व कालबद्ध पूर्तता महत्त्वाची आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने खर्च तर वाढतोच त्यासोबतच त्या त्या भागातील विकासाची संधी नाकारली जाते. त्यामुळे मोठे प्रकल्प आणताना त्याची आर्थिक व्यवहार्यता शेवटपर्यंत कायम राहील याचे भान राखणे महत्त्वाचे असल्याचे दर्डा म्हणाले.
नगररचना, शहरांचे नियोजन नीट न झाल्याने रस्ते, पाणी, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. झोपडपट्टी, पर्यावरणाचे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. या सर्व पार्श्वभूमीवर इन्फ्रा कॉन्क्लेव्ह महत्त्वाची आहे. मंत्री आणि प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी आजच्या कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थित आहेत. या राज्यातील नोकरशाही उत्तम आहे म्हणूनच राज्याचा विकास चांगला होत आहे.- विजय दर्डा