मुंबई – मुंबई, ठाण्यात फक्त झोपड्या नाहीत. तर चाळीदेखील आहे. त्याचा पुर्नविकास करणं गरजेचं आहे. पुढील २-३ वर्षात या चाळींचा विकास केला जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल. मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतुक कोंडीला घाबरतात. मात्र ही कनेक्टिविटी सुरु झाली तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील असा विश्वास पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी घेतली. या मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील विकासावर बोलतोय, त्याचा आनंद वाटतो. कारण विकासावर बोलणं गरजेचे आहे. राज्यात रोज काही ना काही मोठं काम होत असतात. विकासकामाचा उल्लेख केला तर डोळ्यासमोर रस्ते प्रकल्प, मेट्रो प्रकल्प असं दिसतं परंतु बाहेर परदेशात पाहिलं तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा म्हणजे विकास आहे. राज्यात ५१ टक्के शहरीकरण झालेले आहे. शहरीकरण म्हणजे रस्ते, मोठमोठी ऑफिस इतकेच नाही. यूकेचं ट्रान्सपोर्ट सिस्टम एकमेकांशी जोडलेली आहे. चांगल्या शाळा आहेत पण त्याचसोबत उत्तम शिक्षणाचा दर्जा देण्याचं गरजेचे आहे असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
तसेच सार्वजनिक वाहतूक महाराष्ट्रात जास्त आहेत. लंडनचं उदाहरण घेतलं तर ९ हजार बसेस आहे. त्यातील अनेक बसेस डबल डेकर आहेत. डबल डेकर आणलं तर कॅपिसिटी डबल होते. आपण अनेक बसेस आता इलेक्ट्रीक बसेस घेतोय. चार्जिग इन्फ्राही महत्त्वाचं आहे. मुंबईत ३३३७ बसेस आहेत. पुढील काही काळात २१०० इलेक्ट्रीक बसेस घेण्याचा विचार आहे. २०२७ पर्यंत १०० टक्के बसेस इलेक्ट्रीक करण्याचा आमचा मानस आहे. इलेक्ट्रीक बसमुळे चांगला प्रवास, चांगला श्वास घेऊ शकतो असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री मुंबईतील असल्याने त्यांना जाण
मुंबईत १६ वेगवेगळ्या एजन्सी काम करतात. एखादा रस्ता तयार करायचा असेल तर सर्वांशी समन्वय साधावा लागतो. रस्ता खोदण्याचं काम करण्यासाठी पत्र व्यवहार करायला लागतो. या सर्व एजन्सीला सोबत घेऊन काम करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री मुंबईचे आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. मी पालकमंत्री असल्याने आणि मुख्यमंत्री वरच्या मजल्यावर राहत असल्याने त्याचा फायदा जास्त होतो असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.