मुंबई: कोरोना महामारीत अनेकांनी वर्क फ्रॉम होम केलं. पण वर्क फ्रॉम होम काय असतं याची व्याख्याच आम्हाला माहीत नाही. कारण आम्ही सगळेच दिवस फील्डवर होतो, अशा भावना महामुंबई मेट्रो प्रकल्पाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. सोनिया सेठींनी व्यक्त केल्या. मेट्रोच्या २ लाईनवरील सिव्हिल वर्क पूर्ण झालं आहे. आता चाचण्या सुरू आहेत. २०२२ मध्ये मुंबईकरांना गोड बातमी मिळेल, असं सेठी म्हणाल्या. त्या ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलत होत्या.
मुंबईत ३३७ किलोमीटर मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे. एकाचवेळी १८० किमी मार्गाचं काम चाललं आहे. जगात कुठेही एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा जागतिक विक्रम असल्याचं सेठींनी सांगितलं. कोरोना काळात, लॉकडाऊनमध्ये अनेकांनी वर्क फ्रॉम होम केलं. मात्र आम्ही फिल्डवर होतो. आमचं काम घरातून होऊच शकत नाही. कोरोना संकटातही आमचं काम थांबलं नाही. आम्ही फिल्डवर उतरलो नाही, असा एकही दिवस नाही, अशा शब्दांत सेठींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
सध्या मेट्रोच्या ९ लाईन एक्सिक्युशन खाली आहेत. लाईन २ आणि ७ मध्ये सिव्हिल वर्क पूर्ण झालं आहे. आरडीएओच्या चाचण्या झालेल्या आहेत. २०२२ मध्ये चांगली बातमी मिळणार आहे. मेट्रोसाठी आम्ही अनेक महत्त्वाची पावलं उचलली. ग्रीन मेट्रोचा प्रयत्न केला. मेट्रोची टीम युरोपमध्ये घेतली. त्या ठिकाणी २९ स्टेशन्सचा अभ्यास केला. आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेशन्स होतील. ती स्टेशन्स पाहून आपण भारतात आहोत, असं लोकांना वाटणार नाही, असं सेठी म्हणाल्या.