पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या होत्या. तर दुसरीकडे सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानंदेखील आपल्याकडे लसींचा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, यासंदर्भात पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लसीचा दुसरा डोस देणं शक्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. "सध्या शाळा सुरू करण्याचीही गरज वाटते आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुलं घरी आहेत. माझी अनेकदा पालकांशी चर्चाही झाली आहे. आपल्याला १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लसीचा दुसरा डोस देणं शक्य असून यासाठी लसींच्या दोस डोसमधील कालावधी कमी करणं आवश्यक आहे," असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबद्दल विचार करण्याची विनंतीदेखील आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. 'दोन डोसमधील अंतर ४ आठवड्यांवर आणण्यात यावं. त्यामुळे मुंबईतील १०० टक्के नागरिकांचं लसीकरण जानेवारी २०२२ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल,' असं आदित्य यांना पत्रात नमूद केलं आहे. सध्या मुंबईत १०० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला असून दोन्ही डोस मिळालेल्या नागरिकांचं प्रमाण ७३ टक्के इतकं आहे, अशी आकडेवारीदेखील आदित्य ठाकरे यांनी पत्रात मांडली आहे.