मुंबई : रोजच्या राजकीय बातम्यांच्या माऱ्यापुढे विकासकामांचे नेमके होते तरी काय? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतो. सत्ताधारी पक्ष विकासकामे वेगाने होत आहेत असे सांगतो, तर विरोधकांकडून काहीच काम होत नाही, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा विकास होत आहे का? होत असेल तर तो कोणत्या दिशेने होत आहे? किती गतीने होत आहे? याचा शोध घेतला पाहिजे, असे सातत्याने जाणवत होते. त्यामुळेच लोकमतने इन्फ्रा परिषदेचे आयोजन करण्याची भूमिका घेतल्याची माहिती लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी मांडली.
परिषदेच्या आयोजनामागची भूमिका विशद करताना राजेंद्र दर्डा म्हणाले, लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कॉनक्लेव्ह - २०२१ मध्ये पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, त्यातील बदलाचे मोठे टप्पे, त्यातील अडचणी, उपाययोजना आदींबाबत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. आनंदाची बाब म्हणजे ते तसे झाले देखील. या परिषदेत झालेल्या चर्चेतून राज्याच्या विकासपथावरील वाटचालीचे सर्वांगिण चित्र उभे राहिले.