नवी दिल्ली – राजस्थानच्या कोचिंग हब कोटा सध्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे खूप चर्चेत आहे. बुधवारी याठिकाणी NEET तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:चे आयुष्य संपवलं. यावर्षी आतापर्यंत २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात महाराष्ट्रातील लातूरमधील विद्यार्थ्याचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे इतके दडपण येते की त्या ओझ्याखाली ते दबून जातात. परंतु याच तणावाच्या स्थितीत दीपकसारख्या विद्यार्थ्याने नवा प्रकाश आणला आहे. ज्याने अभ्यासाच्या तणावावर मात करत यशाचे शिखर गाठले आहे.
दीपक कोटा इथं JEE तयारीसाठी गेला होता. परंतु काही दिवसांत तिथे त्याचा जीव गुदमरू लागला. त्याने त्याच्या शेतकरी पित्याची आर्थिक स्थिती आठवली. कुटुंबाकडून असणाऱ्या अपेक्षा डोळ्यासमोर आणल्या ज्यांच्या नजरेत मुलगा यशस्वी होण्याचा विश्वास होता. कोटा इथल्या परिस्थितीशी हार न मानता दीपकने संघर्ष करण्याची तयारी केली. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील साबन गावात राहणाऱ्या दीपक राठीचे वडील शेतकरी आहेत. ज्यांची वार्षिक कमाई ३ लाख रुपये आहे. १० वीनंतर मुलाला इंजिनिअरींग बनवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करत त्याला कोटाला पाठवले.
कोटातील अनुभव सांगताना दीपक म्हणतो की, मी २०११ मध्ये १० वी पास झाल्यानंतर कोटाला पोहचलो. मित्रांचा सल्ला आणि १० वीत चांगले मार्क्स मिळाल्यानंतर आयआयटी पास करण्याचे माझे स्वप्न होते. माझे वय कमी होते. मी तयारीला सुरुवात केली. १२ वी पास केल्यानंतर JEE च्या मुख्य परिक्षेसाठी सज्ज झालो. घरातून बाहेर पडल्यानंतर कोटा इथं शिक्षणासाठी चांगले वातावरण असेल असं मला वाटले. तिथे एका छोट्या खोलीत राहिलो. हळूहळू रुटीन, स्पर्धा आणि दबाव यामुळे माझी निराशा झाली. मी सतत चिंतेत होतो. कोटा इथं मुलांच्या खोलीत एक पंखा असतो. जेव्हा तो आत्महत्येचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी त्याला तो पंखा दिसतो.
मला आजही तो दिवस आठवतो...
ज्यादिवशी जेईई मेन्सचा निकाल आला होता. मी माझ्या वडिलांसोबत बसलो होतो. हातपाय कापत होते. भीती वाटत होती. निकाल लागला आणि ज्याची भीती होती तेच घडले. मी अयशस्वी ठरलो. संपूर्ण मेहनत आणि पैसे वाया गेले. मी खूप नैराश्येत गेलो. परंतु तेव्हा माझे वडील माझ्यासोबत होते. त्यांनी मला समजावले आणि मला साथ दिली. २०१३ मध्ये कोटा सोडून पुन्हा घरी परतलो. कुठल्याही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. २०१४ मध्ये दिल्लीत बीएला प्रवेश घेतला. बीएच्या शिक्षणानंतर दीपकला लहानपण आठवले. लहानपणी प्लेन उडवण्याची इच्छा होती. मी हे करू शकेन असं त्याने ठरवले. तरीही वार्षिक २-३ लाख रुपये कमावणाऱ्या वडिलांनी कर्ज काढून दीपकला पायलट ट्रेनिंगसाठी साऊथ आफ्रिकेला पाठवले तिथूनच त्याच्या आयुष्यात टर्निंग पाँईट आला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर २७ एप्रिल २०२३ रोजी दीपकने प्रसिद्ध एअरलाईन्स कंपनीत पायलट म्हणून कामाला सुरुवात केली. आज वार्षिक १ कोटीहून अधिक त्याची सॅलरी आहे.