नवी दिल्ली - गुगलसारख्या नामांकित कंपनीत नोकरी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गुगल त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगले पॅकेजही देते. याचेच उदाहरण अलीकडेच बिहारच्या छोट्या गावात राहणाऱ्या युवतीकडे बघून देता येते. अलंकृता साक्षी या युवतीला गुगलकडून तब्बल ६० लाख पॅकेजचं जॉब ऑफर देण्यात आली आहे. साक्षीनं याबाबत सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.
बिहारच्या भागलपूर येथील नवगछियाच्या सिमरा गावातील युवती अलंकृता साक्षी (Alankrita Sakshi) हिला गुगलनं वर्षाला ६० लाख पॅकेजची जॉब ऑफर दिली आहे. ती लवकरच गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीला रुजू होणार आहे. अलंकृता साक्षीने तिच्या नोकरीबाबत लिंक्डइन अकाऊंटवर पोस्ट केले. त्या पोस्टमध्ये ती म्हणते की, मला हे सांगताना आनंद होतोय की मी गुगलमध्ये सिक्युरिटी एनालिस्ट म्हणून काम करणार आहे. गुगलनं दिलेल्या या संधीबद्दल मी खूप आभारी आहे. प्रगतशील आणि वेगवान टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. माझ्या या प्रवासात मला साथ देणाऱ्यांचे मी आभारी आहे. तुमचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन अमूल्य आहे. नव्या प्रवासासाठी आशीर्वाद द्या असं तिने म्हटलं.
अलंकृता साक्षीच्या या पोस्टवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव लोकांकडून झाला. सोशल मीडियावर तिचीच चर्चा होऊ लागली. तुमची स्वप्ने मोठी असतील तर कुठलेही शहर किंवा गाव महत्त्वाचं नसते. अलंकृता साक्षीच्या या यशाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. तिचे वडील झारखंडच्या कोडरमा इथं राहतात आणि एका खासगी कंपनीत नोकरी करतात तर आई रेखा मिश्रा खासगी शाळेत शिक्षिका आहे. कोडरमा येथून अलंकृता साक्षीचं १० वीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर १२ वीत जवाहर नवोदय विद्यालयात चांगली कामगिरी केली.
अलंकृता साक्षीनं हजारीबाग येथून बी.टेकचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने ती बंगळुरूला गेली. इथं अलंकृताने अनेक मल्टिनॅशनल कंपनीत काम केले. त्यानंतर गुगलकडून नोकरीची जाहिरात आल्यानंतर तिथे अर्ज दाखल केला. त्याठिकाणी अलंकृताची निवड झाली आणि तिला गुगलकडून ६० लाख पॅकेजची जॉब ऑफर देण्यात आली.