नवी दिल्ली - "ये दोस्ती हम नही तोडेंगे.." फिल्म शोले सिनेमातील हे प्रसिद्ध गाणं तुम्ही ऐकलं असेलच. मैत्रीच्या अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशा ३ मित्रांची गोष्ट सांगणार आहोत, जे तिघेही एकत्र शिकले, एकत्र अभ्यास केला आणि तिघेही आज प्रशासकीय सेवेत रुजू झालेत. या तिघांपैकी २ IAS तर १ जण IPS अधिकारी बनला आहे.
ही कहाणी आहे आयपीएस साद मिया खान, आयएएस विशाल मिश्रा आणि गौरव विजयराम यांची. ३ वर्षापूर्वी २०१७ मध्ये या तिघांनी सर्वात कठीण असलेली यूपीएससीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत तिघेही चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. साद मिया खान उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी आहे. विशाल मिश्रासोबत त्यांची भेट हरकोटच्या टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीत बीटेक करताना झाली. या दोघांनी एमटेकसाठी आयआयटी कानपूर येथे प्रवेश घेतला. तेव्हा सादने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
एमटेकनंतर यूपीएससी तयारीसाठी साद खानसोबत विशाल मिश्राने दिल्ली गाठली. त्याठिकाणी या दोघांची भेट गौरव विजयराम यांच्याशी झाली. त्यानंतर हे तिघे जिगरी दोस्त बनले. त्यानंतर तिघांनी आपापली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. साद खाननं यूपीएससी परीक्षा २०१३ मध्ये दिली. मात्र पहिलं यश २०१७ मध्ये मिळालं. साद खान यांचा हा पाचवा प्रयत्न होता. साद यांनी ऑल इंडियामध्ये २५ वी रँक मिळवली परंतु आयएएसऐवजी आयपीएससाठी त्यांची निवड झाली.
गौरव विजयराम यांनीही २०१७ मध्ये चौथ्यांदा यूपीएससी दिली, त्यांना देशात ३४ वा क्रमांक लागला. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, सुरुवातीच्या प्रयत्नात मी मुख्य परीक्षेसाठी तयारी केली नव्हती. त्यानंतरच्या प्रयत्नात जनरल स्टडीज पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळाले नव्हते असं त्यांनी सांगितले. तर आयएएस विशाल मिश्रा उत्तराखंडचे रहिवासी आहेत. आयआयटी कानपूर इथं प्रवेश घेतल्यानंतर साद खान यांच्यासोबत एमटेक केले. त्यानंतर यूपीएससी तयारी करणाऱ्या विशाल मिश्रा यांनाही २०१७ मध्ये यश मिळालं. ऑल इंडिया रँकिंगमध्ये त्यांचा ४९ वा क्रमांक होता.