पटना - दर दिवशी लाखो लोकं आपल्याला हवी तशी नोकरी शोधण्यासाठी संघर्ष करत असतात. मुलाखती देतात. काही लोकांना सुरुवातीलाच यश मिळतं परंतु काही जणांना नोकरीसाठी खूप काळ वाट पाहावी लागते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आयुष्यात कितीही वेळा हताश झाला, अयशश्वी झाला तरीही मेहनत करण्याचं सातत्य ठेवलं तर एकेदिवशी तुमचं स्वप्न नक्कीच साकार होतं.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नातला जॉब शोधण्यासाठी धडपड करत असाल तर तुम्हाला रिजेक्टेड ई मेल, अयशस्वी मुलाखत, कुटुंब आणि सहकाऱ्यांकडून दबाव या सर्व चिंतेतून मुक्त व्हायला लागेल. तुमची पुढील मुलाखत तुमचं आयुष्य बदलून टाकेल असा विश्वास मनात असायला हवा. जर तुम्हाला या गोष्टींवर विश्वास नसेल तर बिहारच्या पटना येथे राहणाऱ्या २४ वर्षीय युवतीनं आज जे काही यश मिळवलं आहे ते पाहून तुम्हालाही विश्वास बसेल. २४ वर्षीय संप्रीती यादव ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
नोकरीसाठीच्या अनेक कठीण प्रसंगानंतर संप्रीतीला गुगल(Google) कडून तब्बल १.१० कोटींची नोकरी मिळाली आहे. परंतु तिचं यश सहजपणे मिळालेलं नसून तिने आतापर्यंत ५० हून अधिक ठिकाणी जॉबसाठी मुलाखत दिली होती. पटनाच्या डेम अकॅडेमीतून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या संप्रीती यादवनं सांगितले की, मी जेव्हाही मुलाखतीला जायची तेव्हा मला खूप भीती वाटायची. तेव्हा माझे आई-वडील, जवळचे मित्र यांनी मला चांगले वाटण्यासाठी प्रोत्साहन दिले. मी मोठ्या कंपनीबाबत जाणून घेण्यासाठी अनेक तास अभ्यास करते. मोठ्या कंपनीतील मुलाखत चर्चेसारख्या असतात. निरंतर अभ्यास आणि फक्त अभ्यास यामुळे मुलाखतीचा सामना करु शकतो त्यानंतर पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखत देऊ शकतो.
काय म्हणाली संप्रीती यादव?
यशाचं शिखर गाठलेली संप्रीती यादव म्हणाली की, मी फक्त प्रामाणिक प्रय़त्न केले. माझ्या प्रयत्नांना फळ मिळालं. मुलाखतीत अयशस्वी होणंही महत्त्वाचं आहे. कारण तेच एखाद्या व्यक्तीला आणखी मेहनत घेण्यासाठी प्रेरित करत असतं. तुम्ही जितका जास्त प्रयत्न करणार तितका पुढील काळात त्याचे चांगले परिणाम झालेले दिसतील. दिल्ली टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटीत मे २०२१ मध्ये बीटेक करणाऱ्या संप्रीतीनं तिच्या आयुष्यातील अनुभव शेअर केले. लंडनस्थित गुगलच्या ऑफिसमध्ये काम करण्याची तिला संधी मिळाली. जेव्हा तिला पॅकेजबद्दल सांगितले तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. या बातमीनं माझा आत्मविश्वास दुपटीनं वाढवला आहे असं तिने म्हटलं.