विदिशा : मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणाऱ्या साजीद अली या वाहनचालकाची मुलगी सना अली हिची इस्रोमध्ये नियुक्ती झाली आहे. तिच्या शिक्षणासाठी आई-व़डिलांनी आपल्याकडील सर्व दागिने गहाण ठेवले होते. मुलीने खूप शिकावे या त्यांच्या स्वप्नाची तिने पूर्तता केली आहे. इस्रोमध्ये निवड झाल्याबद्दल सना अली हिचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अभिनंदन केले आहे.
आपल्या मुलीने खूप शिकावे, देशाची सेवा करावी, असे साजीद अली यांचे स्वप्न होते. सना अली हिची इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये टेक्निकल असिस्टंट पदावर नियुक्ती झाली असून ती तिथे लवकरच रुजू होणार आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने एसआयटी कॉलेजमधून एमटेकचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने सना अली हिला उच्च शिक्षण घेताना अनेक संकटांचा सामना करावा लागला; पण तिच्या आई-वडिलांनी अपार कष्ट घेतले. तिच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही.
मुलींना खूप शिकवले पाहिजे : सना अलीफी द्यायलाही तिच्या आई-वडिलांकडे पुरेसे पैसे नसण्याचा एकदा प्रसंग आला होता. त्यावेळी तिच्या आईने आपले दागिने गहाण ठेवले व पैसे उभे केले. सना शिक्षण घेण्याबरोबरच इतर मुलांच्या शिकवण्या घेऊन अर्थाजनही करत होती व घरखर्चाला हातभार लावत होती. तिने सांगितले की, मुलींना खूप शिकविले पाहिजे. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण केले पाहिजे.
सना अली हिचा ग्वाल्हेर येथील अक्रम या इंजिनिअरशी गेल्या वर्षी विवाह झाला आहे. त्यानंतरही सना आपल्या अभ्यासात गढलेली होती. तिला सासरच्या मंडळींनीही खूप सहकार्य दिले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले की, विदिशा येथील सना अली हिची इस्रोमध्ये नियुक्ती झाली. तिच्यासारख्या कर्तृत्ववान मुलींमुळे मध्य प्रदेशचे नाव आणखी उज्ज्वल झाले आहे.