जयपूर : शिक्षण कमी असले म्हणून काय झाले, कुशल हात अनेकदा आश्चर्यकारककारनामे करून दाखवतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील कन्हैयालाल जांगीड. केवळ आठवीपर्यंत शिकलेल्या मेकॅनिक कन्हैयालालने भंगार वापरून अशी कार बनवली, जी केवळ इको-फ्रेंडली नाही तर एका चार्जिंगवर ७० किलोमीटर मायलेजही देते.
कन्हैयालाल म्हणाले, सूरजगड रोडवर अनेक वर्षांपासून वाहनांच्या दुरुस्तीचे काम करीत आहे. त्या अनुभवातून जुन्या गाड्यांचे सुटे भाग गोळा केले आणि त्यातून एक कार तयार केली. कन्हैयालालने मोटार, कारची बॅटरी, ई-रिक्षाचे टायर इत्यादी वस्तू वापरल्या आणि त्या अशा प्रकारे जोडल्या केल्या की दोन-तीन महिन्यांत पर्यावरणपूरक कार तयार झाली.
जिद्द पूर्ण केलीच...कन्हैयालाल जांगीड सांगतात की, ते फक्त आठवीपर्यंतच शिकू शकले. नववीत नापास झाले होते आणि नंतर घरची जबाबदारी पार पाडावी लागली. त्यामुळेच ते अभ्यास सोडून मेकॅनिक झाले. शिक्षण कमी झाले असले तरी हातातील कलेने आपला रस्ता शोधला. पर्यावरणपूरक कार तयार करण्याचे त्यांच्या मनात आले. कार बनविण्यासाठी भंगार साहित्य वापरले असले तरी एकूण खर्च दीड ते दोन लाखांपर्यंत पोहोचला; पण, त्यांनी आपली जिद्द पूर्ण केलीच.
कारसाठी लागला दीड ते दोन लाखांचा खर्चकन्हैयालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पर्यावरणपूरक कारमध्ये ४८ व्होल्टच्या चार बॅटरी बसविण्यात आल्या आहेत. पण, लवकरच कार केवळ एका बॅटरीवर चालणार आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी १० ते १२ रुपये लागतात. एकदा चार्ज केल्यानंतर कार सुमारे ७० किलोमीटर चालविता येते. कारमध्ये एका वेळी चार जण बसू शकतात. संपूर्ण कार तयार करण्यासाठी जांगीड यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च करावे लागले.