बिहार - शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पशुपालन आणि दुग्धव्यवसायाकडे वळतात. बिहारच्या शिवहर जिल्ह्यातील देकुलीतील धर्मपूर गावातील शेतकऱ्यांनीही हाच मार्ग अवलंबला. हे गाव दूध उत्पादनात शिवहर जिल्ह्यात सर्वात पुढे आहे. दूध व्यवसायाने या गावचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. या गावात पशुपालन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात सर्वाधिक महिलांचा या व्यवसायात सहभाग आहे. काही वर्षापूर्वी देकुली धर्मपूर गावातील बहुतांश घरे कच्ची होती. परंतु आता त्याठिकाणी पक्की घरे तयार झालीत. रोजगाराच्या शोधासाठी गावच्या लोकांना बाहेर जाण्याची गरज भासत नाही.
दूध उत्पादनातून लोकांची चांगली कमाई होऊ लागली आहे. त्यातून घर आर्थिक सक्षम आणि मुलाबाळांना उत्तम शिक्षण देण्याचीही व्यवस्था तयार झाली आहे. सुरुवातीला या गावात जवळपास १५० पशुपालक होते, परंतु आता त्यांची संख्या ५०० हून अधिक झाली आहे. महिला या व्यवसायात हिरारीने पुढे आल्या आहेत. या गावात दरदिवशी १४६०० लीटर दूध उत्पादन होते. गावातील दूध उत्पादक शेतकरी दिवसाला दोन वेळी ८३०० लीटर दूध केंद्रावर जमा करतात. एक उत्पादक सरासरी २५ ते ३० लीटर दूध दिवसाला केंद्रावर आणून देतो. त्यातून दरमहिना १५ हजारांची कमाई होते. गावात १५ शेतकरी असेही आहेत ज्यांच्याकडे १२ ते १५ जनावरे आहेत. ते शेतकरी दर महिन्याला १ लाख रुपयेही कमाई करतात. दूध विकून ५० हजार मासिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३१ आहे. काही शेतकऱ्यांकडे १ ते ६ गुरे आहेत. जिल्ह्यातील तिमूलच्या दोन शीतगृहांपैकी एक या गावात आहे यावरून गावाच्या प्रगतीचा अंदाज लावता येतो.
याआधी गावातील लोकांकडे पोट भरण्यासाठी केवळ रोजंदारी हा मार्ग होता. बहुतांश लोक मोठ्या शहरात नोकरीला जायचे. मात्र आता दुग्ध व्यवसायातून ते चांगली कमाई गावातच करत आहेत. मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, राहायला पक्के घर हे सर्वकाही दुग्ध व्यवसायामुळे गावच्या लोकांना शक्य झाले. अनेक शेतकरी त्यांच्या कमाईतून जमीन खरेदी करत आहेत. गावातील शांती देवी नावाची महिला दुग्ध व्यवसायामुळे मुलांना उत्तम शिक्षण देत आहे. संजय यादव, किशोर राय यासारख्या गावकऱ्यांचे जीवन बदलले आहे. रामकृपाल राय स्वत: पशुपालन करतात आणि दुसऱ्यांनाही त्याचे प्रशिक्षण देत असतात.
देकुली धर्मपूर येथे राहणारे लालुगिरी सांगतात की, गावात तीन प्रकारचे शेतकरी आहे. एक जे तिमुल संस्थेला दूध देतात. दुसरे जे हॉटेल आणि चहाच्या दुकानवाल्यांकडे दूध विकतात आणि तिसरे ते जे स्थानिक लोकांकडे दूधविक्री करतात.या परिसरात भुवनेश्वर नाथ मंदिर असल्याने दूधाचा खप अधिक आहे. तर देकुली धर्मपूर येथील शेतकरी खूप मेहनती आहेत. या गावातील दूध संकलनाचे प्रमाण पाहता तिमुलने या गावातच ५ हजार लीटर क्षमतेचे एक दूध कलेक्शन कोल्ड स्टोअर उघडल्याचे तिमुलमधील कर्मचारी राजाबाबू यांनी म्हटलं. शिवहर जिल्ह्यात २०० हून अधिक दूध संकलन केंद्र आहेत. त्यात ५ हजार लीटर दूध क्षमता असणारे २ केंद्रे आहेत त्यातील एक देकुली धर्मपूर हे गाव आहे.