देशात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. पेट्रोल १०६ रुपये प्रतिलीटर दराने विक्री होत आहे. सर्वसामान्यांना महागाईचा मोठी झळ सहन करावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता ई वाहनाकडे लोकांचा कल वाढला आहे. ऑटो बाजारातही ई वाहनांच्या विक्रीवर भर दिला जात आहे.
पेट्रोलचं दर परवडत नाहीत म्हणून ३३ वर्षीय एस. बासकरण यांनी स्वत: ई बाईकचं डिझाईन तयार केले आहे. ही ई-बाईक एका यूनिटमधून ५० किमी चालू शकते. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार ही बाईक बनवण्यासाठी बासकरण यांना २० हजार रुपये खर्च आला. एस. बासकरण तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील Pakamedu या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी मॅकेनिकल इंजीनिअरींग डिप्लोमाचं शिक्षण घेतलं आहे.
कोरोना महामारीमुळे मागील वर्षी बासकरण यांची नोकरी गेली. त्यानंतर बासकरण यांना शेती करावी लागली. याच काळात बासकरण इलेक्ट्रिक बाईक्सवर रिसर्च करत होते. त्यांनी यासाठी २ हजार रुपयांची सायकल खरेदी केली. या सायकलचं रुपांतर त्यांनी ई बाईकमध्ये केले. यासाठी सायकलला १८ हजार रुपये स्पेअर पार्ट्स लावण्यात आले. या ई बाईकमध्ये त्यांनी इलेक्ट्रीक मीटर, बॅटरी, कंट्रोलर आणि ब्रेक कट ऑफ स्वीच लावला आहे. एक यूनिट बॅटरी चार्ज झाल्यानंतर ही ई बाईक ५० किमी अंतर पार करते. ३० किमी प्रतितास वेगाने ही ई बाईक चालते. बॅटरी संपल्यानंतर पँडल मारूनही तिचं चार्जिंग करता येते. भविष्यात दिव्यांग लोकांसाठी अशाप्रकारे ई बाईक्स बनवून त्यांना मदत करण्याची एस बासकरण यांची इच्छा आहे.
वर्षभरात ६३ वेळा वाढले पेट्रोलचे दर
लोकसभेत पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरात यावर्षी आतापर्यंत तब्बल ६३ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तर केवळ ४ वेळा यांचे दर कमी झाले आहेत. हा सरकारी आकडा १ जानेवारी ते ९ जुलैपर्यंतचा आहे. तसेच पेट्रोलसंदर्भात बोलायचे झाल्यास १२३ दिवस असे होते, ज्या दिवशी पेट्रोलच्या दरात काहीही बदल झाला नाही.
डिझेलचे दर ६१ वेळा वाढले
या वर्षी डिझेलचे दर ६१ वेळा वाढले आहेत. तर चार वेळा डिझेलचे दर कमी झाले आहेत. तसेच १२५ दिवस हे दर जैसेथे होते. गेल्या तीन वर्षांचा विचार करता २०१८-१९ दरम्यान पेट्रोलच्या दरात १४८ वेळा, २०१९-२० मध्ये ८९ वेळा, तर २०२०-२१ मध्ये ७६ वेळा वाढ झाली, तर डिझेलच्या दरात २०१८-१९ मध्ये १४० वेळा, २०१९-२० मध्ये ७९ वेळा तर २०२०-२१ मध्ये ७३ वेळा वाढ झाली.