नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. दरवर्षी लाखो लोक यूपीएससी पास होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात. मात्र अतिशय मोजक्या तरुणांचं हे स्वप्न पूर्ण होतं. यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी बऱ्याच जणांना अनेकदा परीक्षा द्यावी लागते. तर काही जण मात्र पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवतात. हरयाणातील भिवानीमधील एका लहानशा गावात राहणारी निशा ग्रेवाल त्यापैकीच एक. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पास होत तिनं यशाला गवसणी घातली.
निशा ग्रेवालचे वडील वीज विभागात कार्यरत आहे. तर आई गृहिणी आहे. निशानं १२ वीनंतर दिल्ली विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये मानद पदवी घेतली. त्यानंतर तिनं यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यासाठी निशानं एनसीईआरटीच्या पुस्तकांचा आधार घेतला. इंटरनेटवर असलेल्या माहितीचादेखील तिनं भरपूर वापर केला. दिवसातून ८ ते ९ तास अभ्यास करून निशानं नेत्रदीपक यश मिळवलं.
आजोबा रामफल ग्रेवाल यांनी निशाला मोलाची मदत केली. रामफल यांनी शिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांनी प्रत्येक पावलावर निशाला साथ दिली. आजोबांनी निशाकडून परीक्षेची तयारी करून घेतली. त्यामुळेच निशानं तिच्या यशाचं सर्व श्रेय आजोबांना दिलं. निशानं पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत शानदार यश मिळवलं. लोकसेवा परीक्षा २०२० मध्ये तिनं देशात ५१ वा क्रमांक पटकावला. त्यावेळी तिचं वय केवळ २३ वर्षे होतं.