नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं स्वप्न अनेक जण पाहतात. त्यासाठी दिवसातील १२-१४ तास अभ्यास करतात. आयएएस अधिकारी होण्याच्या ध्येयानं पछाडलेले तरुण-तरुणी यूपीएससीसाठी सर्वस्व पणाला लावतात. मात्र तरीही अगदी मोजक्या व्यक्तींना परीक्षेत यश मिळतं. अरुणाचल प्रदेशातील याशनी नागराजन त्यापैकीच एक. पण याशनी दिवसातील केवळ ४-५ दिवस अभ्यास करत यूपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं.
याशनी नागराजननं तिचं शालेय शिक्षण अरुणाचल प्रदेशातील नाहरलगुनमधील केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केलं. बारावीनंतर तिनं पापुम पारे जिल्ह्यात असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंगमध्ये प्रवेश घेतला. तिनं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक विषयातून इंजिनीयरिंगची पदवी घेतली.
बीटेक केल्यानंतर याशनीला नोकरी मिळाली. मात्र आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न तिला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तिनं यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र पूर्ण वेळ काम करता करता परीक्षेची तयारी करणं अवघड होतं. मात्र वेळेचं उत्तम नियोजन करत याशनीनं परीक्षेची तयारी केली.
पूर्ण वेळ काम करूनही याशनीनं अभ्यासासाठी वेळ काढला. तिला दिवसातून ४-५ तास वेळ मिळायचा. या वेळेत ती अभ्यास करायची. शनिवारी, रविवारी अभ्यासासाठी अधिक वेळ द्यायची. पहिल्या दोन प्रयत्नात याशनीला यश मिळालं नाही. मात्र तिसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी ठरली. ती देशात ८३४ वी आली. यावर ती समाधानी नव्हती. त्यामुळे चौथ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय याशनीनं घेतला. या प्रयत्नात ती देशात ५७ वी आली.