नवी दिल्ली:केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC) ने गेल्या महिन्यात नागरी सेवा परीक्षा 2020(CSE परीक्षा 2020) चा निकाल जाहीर केला. यात बिहारच्या शुभम कुमारने देशात अव्वल स्थान मिळवलं आहे. दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षेला बसतात, पण सगळेच यशस्वी होत नाहीत. त्यांच्यापैकी काही असे आहेत जे सलग अपयशानंतरही हिंमत हारत नाहीत. अशीच एक कहाणी केरळमधील रहिवासी असलेल्या एस अस्वथीची(S Aswathy ) आहे, जिने चौथ्या प्रयत्नात यश मिळवलं.
अभियांत्रिकी नंतर TCS मध्ये नोकरी
27 वर्षीय एस अस्वथीने आठवीमध्ये असताना आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. 12वी नंतर तिने अभियांत्रिकी शिकण्याचा निर्णय घेतला आणि तिरुवनंतपुरमच्या सरकारी बार्टन हिल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 2015 मध्ये अस्वथी तिच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होती, तेव्हा तिला TCSमध्ये नोकरी मिळाली. पण, तिचे नोकरीत मन रमत नव्हते आणि काहीकाळा नोकरी केल्यानंतर तिने नोकरी सोडून अभ्यासाला सुरुवात केली.
पहिल्या तीन प्रयत्नात यश मिळाले नाही
नोकरी सोडल्यानंतर, एस अस्वथीने केरळ राज्य नागरी सेवा अकादमी आणि तिरुअनंतपुरममधील काही खाजगी अकादमींमधून यूपीएससी परीक्षेची तयारी केली, परंतु पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अपयश मिळाले. मात्र, असे असतानाही अस्वथीने हिंमत न हारता चौथ्यांदा अधिक अभ्यास करुन परीक्षा दिली आणि यश मिळवंल.
चौथ्या प्रयत्नात 481वा क्रमांक मिळविला
केरळमधील तिरुवनंतपुरम येथील एस अस्वथीने चौथ्या प्रयत्नात यश मिळवलं आणि 481 वा क्रमांक मिळविला. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अस्वथीने सांगितले की, गेल्या 15 वर्षांपासून सिव्हिल सर्व्हंट बनण्याचे तिचे स्वप्न आता पूर्ण झाले. एस अस्वथी म्हणाली, 'सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत माझा हा चौथा प्रयत्न होता. गेल्या तीन वेळा मी प्राथमिक परीक्षाही पास करू शकले नाही आणि त्यामुळे मला थोडी काळजी वाटली. पण, चौथ्या प्रयत्नात ही परीक्षा उतीर्ण केली. अस्वथीने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले, परंतु रँकींगमुळे आयएएस अधिकारी बनू शकणार नाही. त्यामुळे ती पुन्हा परीक्षा देण्याचा विचार करत आहे.
अस्वतीचे वडील रोजंदारी मजूर आहेत
एस अस्वथीचे वडील प्रेम कुमार हे रोजंदारी मजूर आहेत. मुलीच्या यशाने सध्या ते खूप आनंदी आहेत. अस्वथीची आई श्रीलता पी गृहिणी आहे आणि तिचा लहान भाऊ आयटी फर्ममध्ये काम करतो. मुलीच्या यशावर वडील म्हणाले, 'मी खूप आनंदी आहे. कठीण परिस्थितीत तिने नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली, याचा मला अभिमान आहे.'