नवी दिल्ली – एक मुलगा, ज्याचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. शिक्षणासाठी कित्येक मैल पायपीट करत शाळेत गेला. घरची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. वडिलांकडे मुलाला सायकल घेण्यासाठीही पैसे नाहीत. त्या मुलाने गरिबी आणि बिकट परिस्थितीचा सामना करत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी हैदराबादला पोहचला. होमियोपथीचे शिक्षण घेतले आणि स्वत:चा दवाखाना उघडला.
आर्थिक स्थिती थोडी सुधारली. पण यशाचा गर्व डोक्यात गेला नाही. एकेदिवशी युवकाने ५० हजार रुपये गुंतवणूक करून एक प्लॉट खरेदी केला. त्यातूनच युवकाच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. संघर्षाचं यशात रुपांतर झाले. ही कहाणी आहे रिअल इस्टेटमधील प्रसिद्ध जुपल्ली रामेश्वर राव यांची. ज्यांनी केवळ ५० हजारातून ११ हजार कोटींची संपत्ती उभी केली.
५० हजारांच्या प्लॉटनं नशीब बदललं
जुपल्ली रामेश्वर राव यांनी अशावेळी ५० हजारांचा प्लॉट खरेदी केला जेव्हा त्यांना रिअल इस्टेटमधील काहीच माहिती नव्हती. कॉलेजच्या जीवनात ते विद्यार्थी राजकारणात रमले. त्यातून ते अनेकांच्या संपर्कात आले. हा काळ ८० च्या दशकातील आहे. तेव्हा हैदराबादमध्ये रिअल इस्टेट व्यवसाय सुरू झाला होता. वाढणाऱ्या लोकसंख्येसोबत प्लॉटची मागणी वाढू लागली होती. रामेश्वर राव यांनी त्यावेळी ५० हजारांत खरेदी केलेली जमीन तब्बल ३ पटीने अधिक किंमतीत विकली.
डॉक्टरकी सोडून रिअल इस्टेट व्यवसायात उतरले
रामेश्वर राव यांना या व्यवसायात कमाई दिसली. त्यानंतर होमियोपथी प्रॅक्टिस सोडून त्यांनी रिअल इस्टेट व्यवसायात उडी घेतली. १९८१ मध्ये राव यांनी माय होम कंस्ट्रशन नावाची कंपनी उभी केली. कंपनी सुरू केल्यानंतर राव यांनी मेहनतीच्या जोरावर शहरातील बड्या व्यापारांसोबत खांद्याला खांदा लावून काम सुरू केले. निवासी इमारती, व्यावसायिक बांधकाम निर्माणापासून सिमेंट उत्पादनातही त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला.
आजच्या काळात महासिमेंटचा ४ हजार कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल आहे. दक्षिण भारतातील अग्रणी कंपन्यांमध्ये ही एक आहे. राव यांनी ४ मुले आणि सून यांच्या मदतीने साम्राज्याचा विस्तार केला. राव यांच्या एका निर्णयाने त्यांचे आयुष्य बदलले. १९७४ मध्ये एक युवक त्याचा जिल्हा सोडून हैदराबाद येथे पोहचला. त्यानंतर आयुष्यात अनेक वळणे आणि एक संधी मिळाली ज्यामुळे ते आज यशाच्या शिखरावर पोहचले. जर राव यांनी एक प्लॉट खरेदी केला नसता तर आज ते हैदराबादच्या दिलसुख नगर भागात दवाखाना उघडून बसले असते. मात्र एका निर्णयाने त्यांनी जमिनीवरून थेट यश गाठले.
६७ वर्षांचे झाले राव
६ सप्टेंबर १९५५ मध्ये जन्मलेल्या जुपल्ली रामेश्वर राव हे आता वयाच्या ६७ व्या वर्षी पोहचले आहेत. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. रामेश्वर राव यांचा रिअल इस्टेंट, सिमेंट व्यवसाय यासह पॉवर क्षेत्रातही व्यवसाय आहे. रिपोर्टनुसार, राव यांची कंपनी Maha Cement चा वार्षिक उलाढाल ४००० कोटींहून अधिक आहे.