एखादं सुंदर स्वप्न पाहावं आणि अचानक झोपेतून जाग यावी. अशाप्रकारे स्वप्न भंग झाल्याचं दु:ख काय असतं ते मायकल लीन याच्या आई वडिलांनाच माहित. आपल्या मुलाने काहीतरी मोठं ध्येय साध्य करावं म्हणून ते अमेरिकेला आले. पण मायकलनं ऐन यशाच्या शिखरावर असतानाच परत पाठी फिरण्याचा निर्णय घेतला. नेटफ्लिक्स या नावाजलेल्या कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअरचा जॉब त्याने सोडला. त्याला पगार होता तब्बल वर्षाला ३.५ कोटी रुपये. दुसरी कोणतीही संधी हातात नसताना त्याने हा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारणं कुणालाही न पटण्यासारखं. त्याला या जॉबचा कंटाळा आला होता.
मायकलच्या मेंटॉरलाही त्याचं हे वागणं फारस पटलेलं नव्हतं. पण मायकलकडे या प्रश्नाचं रॅशनल उत्तर होतं. त्यानं घेतलेला हा निर्णय कुठल्याही भावनेच्या भरात नव्हता तर हा एक विचारपुर्वक घेतलेला निर्णय होता. नाहीतर वर्षाला ३.५ कोटींची सॅलरी कोण सोडेल. तेही जेवण मोफत आणि स्वत:साठीचा वेळही मुबलक. ही नोकरी त्याच स्वप्नही होतं. अॅमेझॉनमधुन जेव्हा तो नेटफ्लिक्समध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजु झाला तेव्हा नेटफ्लिक्स मधला जॉब तो सोडेल असा विचारही त्याच्या मनात आला नव्हता.
मनाजोगे पैसे कमवत दर दिवसाला नवी आव्हाने पेलत तो शिकत होता. स्वत:चा विकास करत होता. पण घोडं अडलं ते लॉकडाऊनमध्ये. कोरोना आला अन् त्याच्या नोकरीची रयाच गेली. त्याला पैसे तर मिळत होते पण सहकाऱ्यांसोबत मिसळणं, नवीन गोष्टी शिकणं, पगारासोबतच वरची कमाई करणे आदी गोष्टी गमावल्याची खंत त्याला सतवत होती. त्याच्याकडे नोकरी होती, चांगला पगारही होता पण तो ग्रो होत नव्हता.
हळूहळू मायकलला त्याच्या जॉबचा कंटाळा येऊ लागला. तो इतका त्रासदायक ठरु लागला की एप्रिल २०२१मध्ये त्याच्या परफॉर्मन्स रिव्ह्यु करताना कंपनीने त्याला परफॉर्मन्स दाखव नाहीतर जॉब सोड अशी तंबीच दिली. त्यानंतर दोन आठवड्यात मायकलनं जॉब सोडला. मायकलनं नोकरीतील इंट्रेस्ट परत निर्माण करण्यासाठी प्रयत्नही केले. प्रोडक्ट डिझायनिंग या क्षेत्रात काम करत नवीन कौशल्य कमवावं असं त्याला वाटलं. त्यासाठी त्याने कंपनीत अंतर्गत प्रोडक्ट डिझायनिंगच्या पोस्टसाठी अर्जही दिला. पण कंपनीमध्ये याला परवानगी नव्हती.
येथे मायकलची खरी कसोटी होती. त्याने इथेच सगळ संपलं म्हणून हातपाय नाही गाळले. काही दिवस तो डिस्टर्ब झालेला खरा. त्याच्या मेंटॉरने त्याला सल्ला दिलेला की ही नोकरी त्याने सोडली तर पुढे पगारात हवी तशी वाढ मिळणार नाही. किंबहुना आहे तो पगार मिळेल याचीही शाश्वती नाही.
तरीही मायकलने नवा रस्ता निवडलाच. ज्या प्रोडक्ट डिझायनिंगमध्ये त्याला नोकरी करण्याची हौस होती त्याचाच त्याने व्यवसाय सुरु केला. मायकल म्हणतो, '' नेटफ्लिक्स मधुन मी नोकरी सोडुन ८ महिने झाले. मी काही खुप पैसे कमवत नाही. पण माझ्या मनाला मी जे करतोय त्याचं समाधान मिळत आहे. ही सुरुवात जरी असली तरी यातून निश्चितच काहीतरी चांगलं घडेल असा विश्वास मला वाटतो''.