मुंबई - बिझनेस रिएलिटी शो शार्क टँक इंडिया सीझन २ मध्ये अनेक लोक स्वत:ची स्वप्न साकारण्यासाठी येत आहे. आता शो च्या अलीकडच्या एपिसोडमध्ये इंटरप्रेन्योर भास्कर केआर नावाच्या व्यक्तीच्या संघर्षमय कहाणीनं प्रत्येकाची मनं जिंकली आहेत. रस्त्यावरून संघर्ष करत आज कोट्यवधीचा बिझनेस उभारणाऱ्या भास्करनं मेहनतीच्या बळावर यशाचं शिखर गाठले आहे.
भास्कर केआरनं शार्क टँकमध्ये सर्व जजेसना त्याची स्ट्रॅगल स्टोरी सांगितली. कर्नाटकात राहणाऱ्या भास्कर केआर आज कोट्यवधीच्या फूड बिझनेसचे मालक आहेत. त्यांच्या ब्रॅंडचं नाव भास्कर पुरणपोळी घर असं आहे. सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही ठिकाणी भास्कर पुरणपोळी घर सुरू आहे. परंतु लवकरच संपूर्ण भारतात भास्कर यांना त्यांच्या बिझनेसचं मॉडेल उभे करायचा आहे. हाच निर्धार घेऊन भास्कर केआर हे शार्क टँक इंडियाच्या सीझन २ (Shark Tank India Season 2) मध्ये सहभागी झाले.
एपिसोडमध्ये भास्कर यांनी सांगितले की, आज भलेही माझ्याकडे कोट्यवधीचा बिझनेस आहे परंतु एकेकाळी मी कर्नाटकातील रेस्टॉरंटमध्ये वेटरचा जॉब करत होतो. फूड बिझनेस सुरू करण्यापूर्वी मी ८ वर्षे छोटी-मोठी नोकरी केली. सुरुवातीच्या काळात मी स्वत: पूरणपोळी बनवून विकत होतो. परंतु जेव्हा लोकांना पूरणपोळीची चव आवडू लागली तेव्हा एक दुकान खरेदी करून पूरणपोळी विकणं सुरू केले.
त्यानंतर हळूहळू उद्योग वाढत गेला. कर्नाटकात स्वत:च्या नावानं पूरणपोळी घर लॉन्च केले. त्यानंतर महाराष्ट्रात आणि कर्नाटकात अनेकांनी भास्कर पूरणपोळी फ्रेंचाइजी सुरू केली. शार्क टँक इंडिया सीझन २ मध्ये भास्कर केआर यांनी १ टक्के इक्विटी शेअरसह ७५ लाख रुपये यांची मागणी केली. सर्व शार्क टँक भास्करच्या बिझनेस मॉडेलनं चकीत झाले. परंतु त्यांनी भास्कर यांना फंडिग देण्यास नकार दिला. हा बिझनेस पहिल्यापासून प्रॉफिटमध्ये असून कुणाच्या गुंतवणुकीची गरज नाही असं जजेसनं भास्कर यांना म्हटलं.