अमृतसर - पंजाबमधील बाटला येथे राहणारे जगमोहन सिंग नागी यांनी वयाची ६३ वर्षे ओलांडली आहेत. वयाच्या या टप्प्यावर ते शेतीत सक्रिय आहेत. शेतीत चांगला नफा मिळत नाही असं म्हणणाऱ्यांना त्यांनी चुकीचे सिद्ध केले आहे. ते अनेक दिवसांपासून कंत्राटी शेती करत आहेत. या माध्यमातून आज त्यांनी आपली कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. त्याचसोबत युवकांना शेतीशी जोडण्याची संधी देत आहेत.
७ कोटींहून अधिक उलाढालजगमोहन सिंग नागी यांच्या म्हणण्यानुसार, ते मका, मोहरी आणि गहू याशिवाय गाजर, बीटरूट, कोबी, टोमॅटो अशा अनेक हंगामी भाज्यांची लागवड करतात. त्यानंतर मोठ्या कंपन्यांना ते या उत्पादनांचा पुरवठा करतात. इंग्लंड, न्यूझीलंड, दुबई, हाँगकाँग येथे ते मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादनं निर्यात करत आहे. सुमारे ३०० शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. यातून ते ३०० एकरात कंत्राटी शेती करत आहेत. सध्या त्यांची वार्षिक ७ कोटींहून अधिक उलाढाल होत आहे.
इंग्लंडमध्ये घेतलं शिक्षणजगमोहन सिंग नागी सांगतात की, भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी त्यांचे वडील कराचीमध्ये राहत होते. त्यानंतर ते मुंबईत आले, तेथून पुन्हा पंजाबमध्ये शिफ्ट झाले. त्यांनी पिठाच्या गिरणी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. माझे वडील या क्षेत्रात काम करत असताना मलाही खाद्यपदार्थाच्या व्यवसायात रस निर्माण झाला. सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते फूड सीरियल मिलिंग आणि इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करण्यासाठी इंग्लंडला गेले. मग परत आले आणि शेतीशी संबंधित व्यवसायात उतरले.
मका लागवडीपासून व्यवसाय सुरूजनमोहन यांनी सर्वात आधी कॉर्न मिलिंगचा म्हणजेच मक्यावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय सुरू केला. हिमाचलच्या शेतकऱ्यांकडून मका खरेदी सुरू केला. मात्र, त्याच्या वाहतुकीसाठी मोठा खर्च येतो. हे लक्षात घेऊन त्यांनी स्वत: मक्याचे पीक घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान पंजाब कृषी विद्यापीठाशीही करार करण्यात आला होता. १९९१ मध्ये मी कंत्राटी शेती सुरू केली. शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी सुरू केली. त्यामुळे मला नफाही मिळू लागला, तसेच शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळू लागले.
मोठ्या कंपन्यांसोबत व्यवहारजगमोहन सिंग नागी हे मका मोठ्या स्नॅक्स आणि पिझ्झा कंपन्यांना विकत आहे. आता ते कॅनिंग आणि भाजीपाला व्यवसायातही नशीब आजमवत आहेत. सरसों का साग, दाल मखनी या पारंपरिक पंजाबी खाद्यपदार्थांसोबतच आम्ही बेबी कॉर्न, स्वीट कॉर्नचा व्यवसायही सुरू केला आहे. सध्या सेंद्रिय गव्हाचे पीठ आणि मक्याचे पीठ यावर त्यांचा अधिक भर आहे. त्याची स्थानिक बाजारपेठेत विक्री करून ते भरघोस नफा कमावत आहे. आगामी काळात मोहरीच्या तेलावर प्रक्रिया, भात आणि चिया बियाणे लागवड सुरू करण्याचाही त्यांचा विचार आहे.
युवकांना देतायेत प्रशिक्षणअलीकडच्या काळात नवी पिढी शेतीपासून लांब जात आहे. त्यांना पुन्हा याकडे प्रेरित करण्यासाठी खेड्यापाड्यात शेतीवर आधारित व्यवसाय वाढवावे लागतील. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत. अधिकाधिक शेतकरी शेतीशी संबंधित व्यवसायांशी निगडीत आहेत. यासाठी ते शेतीची आवड असलेल्या तरुणांना प्रशिक्षणही देतात असं जगमोहन सिंग नागी यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"