Inspirational Story : "जीवनातील परिस्थितीवर रडणं अयोग्य"; लिंबू पाणी विकणारी महिला बनली सब इन्स्पॅक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 11:54 PM2021-06-27T23:54:06+5:302021-06-27T23:55:05+5:30
Inspirational Story : सिंगल मदर असल्यानं कोणी घरही देण्यास होत नव्हतं तयार. अॅनी असं त्यांचं नाव आहे.
आपली इच्छाशक्ती आणि आपल्या मनात विश्वास असला की आपण सर्वकाही मिळवू शकतो. असंचं लिंबू पाणी विकणाऱ्या केरळच्या अॅनी यांनी यश मिळवत त्या आज पोलीस सब इन्सपॅक्टर झाल्या आहेत. केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कांजिरामकुलम या ठिकाणी राहणाऱ्या एसपी अॅनी या २१ वर्षांच्या असतानाच आपल्या पतीपासून विभक्त झाल्या. त्यावेळी त्यांच्या आईवडिलांना त्यांना आणि त्यांच्या आठ महिन्याच्या मुलाला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर त्या आपल्या आजीच्या घरी राहू लागल्या. घराघरात जाऊन वस्तू विकण्यापासून लिंबू सरबत विकण्यापर्यंतही त्यांनी या काळात कष्ट केले.
अनेक समस्या समोर असतानाही अॅनी त्या समस्यांसमोर झुकल्या नाहीत आणि त्यांनी त्यांचा सामना केला. सध्या त्या ३१ वर्षांच्या असून त्यांनी आपल्या आयुष्यातल्या नव्या अध्यायाला सुरूवात केली आहे. अॅनी यांनी शनिवारी वर्कला पोलीस स्थानकात सब इन्सपॅक्टर म्हणून कार्यभारी हाती घेतला. त्यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनीही त्यांचं अभिनंदन केलं.
पदवीच्या पहिल्याच वर्षाला शिकत असताना आपल्या आईवडिलांच्या पसंतीच्या मुलाशी त्यांनी लग्न केलं. परंतु नंतर त्या विभक्त झाल्या आणि आपल्या आजीच्या घरी राहू लागल्या. अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यानंतर त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं.
... म्हणून केला बॉयकट
अॅनी यांनी घराघरात जाऊन सामान विकण्यापासून विमा पॉलिसी विकण्यापर्यंत प्रत्येक काम केलं. परंतु जेव्हा त्यांना यात यश मिळालं नाही तेव्हा त्यांनी लिंबू सरबत आणि आयस्क्रिम विकण्यास सुरूवात केली. परंतु एका मोठ्या शहरातही त्या सिंगल मदर असल्यामुळे त्यांना कोणी भाड्यानं घर देण्यास तयार नव्हतं. त्यामुळेच त्यांना अनेकदा आपली जागा बदलावी लागत होती. यादरम्यान लोकांच्या वाईट नजरांपासून वाचण्यासाठी त्यांनी बॉयकट हेअरस्टाईल ठेवण्याचाही निर्णय घेतला.
बनल्या सिव्हिल पोलीस अधिकारी
अॅनी यांच्या एका नातेवाईकानं त्यांना पोलीस अधिकाऱ्याची सेवा बाजवण्यासाठी प्रोत्साहित केलं. तसंच सोबत सब इन्स्पॅक्टरची परीक्षा देण्यासही सांगितलं. त्यांनी अॅनी यांनी परीक्षेची तयारी करण्यासाठी काही पैसेही दिले. २०१६ मध्ये त्यांना यश मिळालं आणि त्या पोलीस अधिकारी झाल्या. तीन वर्षांनंतर त्यांनी सब इन्स्पॅक्टरची परीक्षाही उत्तीर्ण केलं आणि दीड वर्षांच्या ट्रेनिंगनंतर त्या शनिवारी वर्कला पोलीस स्थानकात प्रोबेशनरी सब-इन्स्पॅक्टर म्हणून रुजू झाल्या.
"मला आयपीएस अधिकाऱ्याच्या रूपात पाहणं ही माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. यासाठी मी मेहनतीनं अभ्यास केला. नोकरी मिळवणं माझं मिशन होतं. जीवनाच्या परिस्थितीवर रडून काही फायदा नाही. आम्हाला उडी घेणं आवश्यक आहे. आपण जोपर्यंत हरलोय हे ठरवत नाही तोपर्यंत आपला पराजय होत नाही," असंही अॅनी म्हणाल्या.