Success Story: एकदा मनात ठरवले की माणूस काहीही करू शकतो, याची अनेकविध उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असतात. काहींना त्यात यश येते. पण काहींना अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र, एका तरुण अभियंत्याने असताना जिद्दीने आणि मेहनतीने जयप्रकाश ग्रुपची स्थापना एका अभियंत्याने केली होती ज्याचा पगार एकावेळी फक्त २१८ रुपये होता.
जयप्रकाश गौर असे या व्यक्तीचे नाव आहे. गौर यांचा जन्म १९३१ मध्ये उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातील गौर यांनी रुरकी येथून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना नोकरी लागली आणि फक्त २१८ रुपये पगार मिळायचा. बेटवा नदीवर धरण बांधण्याचे काम सुरू होते. त्यात ते काम करायचे. मात्र, याच कामासाठी कंत्राटदार दरमहा सुमारे ५ हजार रुपये कमावतो, हे त्यांच्या लक्षात आले. यांनतर त्यांनी इतरांसाठी काम करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
अशी झाली जेपी ग्रुपची सुरुवात
जेपी गौर यांनी नोकरी सोडून १९५८ मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु केला. यानंतर त्यांच्या व्यवसायाने अल्पावधीतच यशोशिखर गाठले. एक दिग्गज समूह उदयाला आला. फॉर्म्युला वन रेसिंग ट्रॅकसाठी देशातील पहिला ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे तयार करणारी जेपी कंपनी बनली आहे. १६५ किमी लांबीचा ग्रेटर नोएडा-आग्रा एक्सप्रेसवे किंवा यमुना एक्सप्रेसवे हे जेपीचे काम आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातही जेपींचा डंका वाजला. जेपी बिल्डर्सचे दिल्ली एनसीआरमध्ये ३२,००० पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत.
फोर्ब्सच्या यादीत पटकावले स्थान
गौर अभ्यासासाठी बाहेर गेले होते तेव्हा त्यांच्याकडे फक्त १०० रुपये होते. खूप स्वप्ने होती, पण सुरुवात कशी करायची हे माहिती नव्हते. प्रदीर्घ संघर्षानंतर गौर यांनी करोडोंची उलाढाल असलेली कंपनी यशस्वी करून दाखवली. २०१० मध्ये फोर्ब्स मासिकाच्या भारतातील अब्जाधीशांच्या यादीत गौर ४८व्या क्रमांकावर होते. नंतर २०१२ मध्ये त्यांना फोर्ब्स मॅगझिनमध्ये पुन्हा स्थान मिळाले.
दरम्यान, देशात आताच्या घडीला काही बड्या कंपन्यांची विक्री होताना दिसत आहे. अगदी बिसलेरीपासून ते सरकारी क्षेत्रातील अनेकविध कंपन्यांचे अन्य मोठ्या कंपन्या अधिग्रहण करण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्जबाजारी जेपी ग्रुपची सिमेंट कंपनी विकली जाणार आहे. दालमिया सिमेंटने जेपीचा सिमेंट व्यवसाय ५,६६६ कोटी रुपयांत खरेदी केला आहे. दालमिया सिमेंट लिमिटेड (डिसीबीएल) ही कंपनी दालमिया भारत लिमिटेडच्या मालकीची एक सिमेंट कंपनी आहे. याच कंपनीने जेपी सिमेंट खरेदीचा करार केला. मात्र, जयप्रकाश असोसिएट्स सिमेंट प्लांटची विक्री करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१६ मध्ये अल्ट्राटेकने जेपी सिमेंटचे प्लांट विकत घेतले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"