- गजानन चोपडे(वृत्त संपादक, अमरावती)बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांत नापास होणारा तरुण केवळ जिद्द, प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या भरवशावर चक्क आयपीएस होतो. त्याचा गुणवंत सेवा पदकाने सन्मान केला जातो. विश्वास बसत नाही? ‘लोकमत’ने ८ जुलै २०१९ च्या अंकात प्रसिद्ध केलेली बातमी एव्हाना एखाद्या चित्रपटाची पटकथा नव्हती. ती होती केवळ बातमी. आता मात्र आयपीएस मनोजकुमार शर्मा यांच्या संघर्षाचा अतिशय रंजक प्रवास ‘ट्वेल्थ फेल’ या गाजत असलेल्या चित्रपटातून पडद्यावर उलगडला आहे. शर्मा यांना नुकतेच गृहमंत्रालयाच्या गुणवंत सेवा पदकाने गाैरविण्यात आले. या झाकलेल्या माणिकचा शोध ‘लोकमत’ने घेतला अन् ‘ट्वेल्थ फेल’ने थेट ऑस्करपर्यंत झेप घेतली. ‘लोकमत मीडिया समूहा’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांची मनोजकुमार शर्मांशी मुंबईत भेट झाली. शर्मा यांचा संघर्षमय प्रवास ऐकून डॉ. विजय दर्डा यांनी हा प्रवास बातमीच्या रूपात वाचकांपुढे मांडण्याची सूचना केली. लगेच शर्मा यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे बारकावे समजून घेतल्यानंतर बातमी प्रकाशित झाली. बातमी व शर्मा यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. दरम्यान, अनुराग पाठक लिखित ‘ट्वेल्थ फेल, हारा वही जो लढा नही’ ही कादंबरी आली व आता याच कादंबरीचा आधार घेत चित्रपटातून मनोज कुमार शर्मा यांचा जीवनपट उलगडण्यात आला. ९९ टक्के गुणांच्या स्पर्धेत आपल्या पाल्यांना बघू पाहणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा चित्रपट आहे. राजरोसपणे कॉपी चालणाऱ्या केंद्रावर एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याने धाड टाकून कॉपी बंद केली नसती तर शर्मा यांना आयपीएसचा मार्ग कदाचित गवसलाच नसता.
...अन् आयुष्यच पालटलेबारावीमध्ये नापास झाल्यानंतर वडिलांनी सेकंड हॅंड टेम्पाे खरेदी केला. मनाेजकुमार व त्यांचा भाऊ दाेघेही ताे चालवायचे. टेम्पाे जप्त झाला आणि ताे साेडविण्यासाठी मनाेजकुमार कार्यालयात गेले. ज्यांच्या ‘काॅपी बंद’ कारवाईमुळे मनाेजकुमार नापास झाले, तेच अधिकारी तेथे भेटले. त्यांना पाहून ठरविले, मला यांच्यासारखेच बनायचे आहे. मग काय, थेट त्यांनाच विचारले. त्यांनीच पुढचा मार्ग दाखविला.