जर तुमच्याकडे काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कुठलंही यश मिळवताना काही अडचण येणार नाही. पटनाच्या ज्योतीसोबतही असेच काहीसे घडले. ज्योतीचे डोळे उघडले तेव्हा ती बेवारस पटना रेल्वे स्टेशनवर एकटी पडली होती. कित्येक दिवस ज्योतीनं भीक मागून जीवन जगलं. परंतु आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द आणि आत्मविश्वास तिच्याकडे होता. केवळ शिक्षण घेऊन ती थांबली नाही तर पटना शहरात आता ती कॅफेटेरिया चालवते. ज्योतीच्या या संघर्षमय जीवनातून अनेकांना प्रेरणा मिळेल.
पटना रेल्वे स्टेशनवर भीक मागायची
१९ वर्षीय ज्योतीला तिचे आई-वडील कोण आहेत याचीही कल्पना नाही. ती सांगते की, पटना रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या एका जोडप्याला बेवारस अवस्थेत ती सापडली होती. त्यांनीच ज्योतीला लहानाचं मोठं केले. जेव्हा तिला कळायला लागलं तेव्हा त्यांच्यासोबतच ती भीक मागण्यासाठी लोकांसमोर हात पसरत होती. ज्यादिवशी काही कमी मिळायचं तेव्हा कचरा वेचून ती कमवायची. ज्योतीचं जीवन असेच पुढे जात होते. परंतु अचानक तिच्या मनात शिक्षणाची इच्छा निर्माण झाली. लहानपणी न शिकता जीवन जगलं परंतु शिक्षणाची ओढ कमी झाली नाही.
अचानक आयुष्याला मिळालं नवं वळण
ज्योतीने सांगितले की, याच काळात माझ्यावरील पालकांचा छत्र हरपलं. ज्या आईनं वाढवलं तिचा मृत्यू झाला. ज्योतीच्या जीवनात अंधार पसरला. परंतु तिने हिंमत हरली नाही. आयुष्यात पुढे जायचं स्वप्न उराशी बाळगत ज्योतीने पुढे पाऊल टाकलं. पटना जिल्हा प्रशासनाने ज्योतीची जबाबदारी एका स्वयंसेवी संस्थेला दिली. रॅबो फाऊंडेशनच्या बिहार प्रमुख विशाखा कुमारी सांगतात की, पटना इथं त्यांचे ५ सेंटर आहेत. ज्यात गरीब, अनाथ मुलांचं पालनपोषण केले जाते. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते. ज्योती या फाऊंडेशनमध्ये आल्यापासून स्वप्नांना बळ मिळालं.
ज्योतीनं तिचं शिक्षण पूर्ण केले. मॅट्रिक परीक्षेत तिला चांगले मार्क्स मिळाले. त्यानंतर उपेंद्र महारथी संस्थानात मधुबनी पेटिंगचं प्रशिक्षण घेतलं. ज्योतीचं शिक्षण सुरु होतं परंतु तिला आणखी काही हवं होतं. तिच्या मेहनतीला पाहून एका कंपनीत कॅफेटेरिया चालवण्याचं काम ज्योतीला मिळालं. आज ज्योती स्वबळावर कॅफेटेरिया चालवते. सकाळ ते रात्रीपर्यंत ज्योती कॅफेटेरियात असते आणि रिकाम्या वेळेत ती अभ्यास करते. ज्योती आता स्वत:चे पैसे खर्च करत एका भाड्याच्या खोलीत राहते. मार्केटिंग क्षेत्रात ज्योतीला नाव कमवायचं आहे. ज्योतीचं हे खडतर आयुष्य पाहून अनेकांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा मिळेल यात शंका नाही.