जळगाव : स्पप्न पूर्ण व्हायला काही लागत नाही. फक्त मनाशी जिद्द व मेहनतीची तयारी हवी. मग कितीही अडथळे आले तरी तुम्हाला रोखू शकत नाहीत. जळगावच्या राजारामनगरमधील कोमल शिंदे हिला कॉलेजची फी भरताना नाकीनऊ यायचे, स्टडी टूरला जायचे तर आधी भावला पाठवायचे की स्वत: जायचे अशी तजजोड करावी लागे. आज हीच मुलगी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
कानळदा रस्त्यावरील राजारामनगरमध्ये छोट्या तीन खोल्यांच्या घरात राहणारी कोमल शिंदे (२६) पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ४ जुलै २०२३ रोजी, निकाल घोषित झाला. त्यावेळी गगन ठेंगणे झाले मात्र, या यशाचा मार्ग सोपा नव्हता. कोमल व तिचा भाऊ भावेश दोघेही धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना कॉलेजची फी भरताना नाकीनऊ यायचे. कॉलेजची स्टडी टूर असली, तर दोघांपैकी आधी कोणी जायचे हे या भावंडांना ठरवावे लागे.
दोघांनीही मुलांसाठी दिवसरात्र एक केला...आई भारती व वडील सोपान शिंदे दोघांनीही मुलांच्या शिक्षणासाठी दिवसरात्र एक केला. आई २०१९ पर्यंत सकाळी खासगी कंपनीत काम करून घरी आल्यावर कपड्यांना इस्त्री करून द्यायची. वडील १९९७ पासून जळगावच्या ग्रामीण भागात २५ गावांमध्ये फिरून कपडे विकतात. सुरुवातीला त्यांच्याकडे सायकल होती, नंतर टू व्हीलर घेतली. घरखर्च ते सांभाळतात, तर आईने आमच्या शिक्षणासाठी आर्थिक तजवीज केली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जळगावातच केला, अशी माहिती कोमल शिंदे यांनी दिली.
त्या दिवशी खूप रडले..४ जुलैला माझा वाढदिवस होता. २०२० पासून परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती पण निकाल लागत नव्हता, त्यामुळे रडत होते. याआधी लिपिक व कर सहायक पदाची परीक्षा १-२ गुणांनी पास होऊ शकले नव्हते. त्यामुळे याही परीक्षेत काय होते याचे टेन्शन आले होते. मोबाईल बंद करून घरात बसून होते. मित्र-मैत्रिणींनी येऊन निकाल लागला आणि तू परीक्षा पास झाल्याचे सांगितले. पुढील महिन्यापासून नाशिकला प्रशिक्षण आहे. नियुक्ती मिळाल्यावर आई-वडिलांनी सोबत घेऊन जाणार असल्याचे कोमल शिंदे म्हणाली. आई-वडिल प्रेरणास्त्रोत आहेत. आई घरी आल्यावर दिवसभरात काय काम केले, कशी मेहनत घेतली हे सांगायची. त्यांचे कष्ट मुलांना कळायला हवेत, असेही कोमल म्हणाली.
कोमल शिंदे ही समाजकार्य महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिला नेहमीच सर्वांनी प्रोत्साहन व पाठिंबा दिला. समाजकार्य अभ्यासक्रमात वेगवेगळे विषय अभ्यासता येतात. विद्यार्थी समाजघटकांशी जोडलो जातो. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहेत.- डॉ राकेश चौधरी, प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय