नागपूर: टोकियो ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारोत्तोलनपटू मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची. सहा भावंडांतील ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडे ती घेऊन यायची. तिने आणलेली मोळी तिच्या मोठ्या भावांनाही उचलता येत नसे. तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला भारोत्तोलक बनवावे अशी तिची इच्छा होती. पण मीराला मात्र तिरंदाज व्हायचे होते. त्याचवेळी आठवीच्या पुस्तकात तिने मणिपूरच्याच कुंजुराणी देवीवरचा धडा वाचला आणि तिच्या आयुष्याचे ध्येय ठरले.. भारोत्तोलकच व्हायचे!
खडतर परिश्रम करत राज्य, राष्ट्रीय पातळीवर उत्तम चमक दाखवली. आशियाई, राष्ट्रकुल, विश्व अजिंक्यपद अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिने सुवर्णपदके जिंकली. पण २०१६ च्या च्या रिओ ऑलिम्पिकमधे तीन प्रयत्नात वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्या कारकिर्दीला लागलेला हा फार मोठा ‘डाग’ होता. त्यातच तिला पाठीच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होऊ लागला. दोन-तीन दिवसातून एकदा सराव करणेही अशक्य झाले. कोविडचं संकट ! लॉकडाऊनमुळे सराव पूर्णपणे बंद! करिअर संपणार की काय, अशी सर्वांना धास्ती वाटू लागली. पण केंद्र सरकारने ७१ लाख रुपये खर्च करून तिला सरावासाठी अमेरिकेत पाठविले.
तिथल्या प्रशिक्षणाचे चांगले परिणाम लवकरच दिसू लागले. दररोज सराव करणे शक्य झाले. हळूहळू दिवसातून दोनदा सराव करायलाही जमू लागले. तिची जिद्द, चिकाटी, मेहनत यावर प्रशिक्षक खूश झाले.. आणि पुन्हा एकदा मोठ्या परीक्षेचा दिवस उजाडला ... टोकियो ऑलिम्पिक ! यावेळी मीरा पूर्ण तयारीत होती. यावेळी रिओची पुनरावृत्ती घडणार नव्हती.
४९ किलो गटात ‘क्लीन अँड जर्क’ मध्ये ११५ किलो वजन उचलून नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड केला. एकूण २०२ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. संपूर्ण देशात आनंदाची लहर उमटली. जे हात लाकडाची मोळी वाहून आणत होते तेच आज ‘ऑलिम्पिक पदक’ अभिमानाने उंचावत आहेत. अतिशय प्रेरणादायी अशी ही जीवनकथा ! आता शालेय पुस्तकात मीराबाईच्याही जीवनावरचा एक धडा समाविष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
कानातील रिंग्स पाहून आई झाली भावुकमीराबाईला आई सेखोम ओंग्बी तोम्बी लीमा यांनी पाच वर्षाआधी स्वत:चे दागिने विकून ऑलिम्पिकच्या रिंग्स असलेल्या कानातील बाळ्या दिल्या होत्या. स्पर्धेदरम्यान मीराबाईच्या कानात त्या दिसत होत्या. यामुळे मुलीचे भाग्य चमकेल, अशी आईला आशा होती. आज आईचे स्वप्न पूर्ण होताच या मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या म्हणाल्या, ‘मी मुलीच्या कानातील बाळ्या टीव्हीवर पाहत होते. मुलीने पदक जिंकताच माझ्या भावना अनावर झाल्या.’
वडील सेखोम कृती मेईतेई यांच्याही डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, ‘माझ्या मीराने मेहनतीच्या बळावर यश मिळवले.’ राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर नोंगपोक काकचिंग येथे मीराबाईचे घर आहे, कोरोनामुळे तेथे सध्या कर्फ्यूसदृश स्थिती असली तरी अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी अनेक जण हजेरी लावत आहेत. घरी काही नातेवाईक आणि मित्रमंडळी काल रात्रीपासूनच एकत्र आले होते. मीराबाईच्या कुटुंबात तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. स्पर्धा सुरू होण्याआधी मीराबाईने व्हिडिओ कॉलवर आईवडिलांसोबत बोलणे केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले, अशी माहिती येथे जमलेल्या अनेक पत्रकारांनी दिली.
कौतुकांचा वर्षाव...गृहमंत्री अमित शाह, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू, भारताचा एकमेव वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, महान खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर, ऑलिम्पिक पदक विजेती मल्ल साक्षी मलिक, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता भारोत्तोलनपटू सतीश शिवलिंगम यांनीही मीराबाईवर शुभेच्छांचा वर्षाव केला.