नवी दिल्ली – देशात मेटल आणि एनर्जी सेक्टरमधील मोठ्या व्यावसायिक कंपन्यांपैकी एक वेदांता ग्रुप आहे. या ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल(Anil Agarwal) मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आले असून आज यशाच्या शिखरावर आहेत. वयाच्या १९ व्या वर्षी बिहारमधून नोकरीच्या निमित्तानं ते मुंबईत आले. याठिकाणी छोटं दुकान सुरू करून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. प्रचंड मेहनतीच्या बळावर त्यांनी उद्योग उभा केला. परंतु या यशामागे त्यांचा खडतर जीवन प्रवास ऐकला तर तुम्हालाही कौतुक वाटेल.
४०० रुपयांत ४ मुलांचं पालनपोषण
अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या आईच्या बलिदानाची आणि त्यागाची कहानी जागतिक महिला दिनी ट्विटरवरून शेअर केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, आई, माझ्या लहानपणी तुझ्या त्यागाने मला घडवलं आणि माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला दिली. त्याकाळी केवळ ४०० रुपयांत ४ मुलांचं पालनपोषण तू करत होतीस. परंतु नेहमी आमच्या मुलांचं पोट पूर्ण भरेल याची तू काळजी घेतली. मी स्वत:ला भाग्यवान मानतो, मी आजही तुझ्यासोबत राहतो आणि तू नेहमी मला जगण्याची प्रेरणा देत राहते.
१५० कोटींहून अधिक दान
अनिल अग्रवाल, आज भलेही मोठे उद्योगपती असो वा त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असो. परंतु आजही ते पूर्वीचे मध्यमवर्गीय कुटुंबाचे जीवनमुल्य जपून आहेत. जागतिक महिला दिनी अनिल अग्रवाल यांनी पत्नी आणि मुलीचं त्यांच्या आयुष्यातील योगदानाचाही उल्लेख केला. कोरोना काळात वेदांता समुहाने लोकांच्या मदतीसाठी १५० कोटींहून अधिक रक्कम दान केली होती.
छोट्याशा ऑफिसमधून केली सुरूवात
अनिल अग्रवाल यांनी यापूर्वी एका ट्विटमध्ये त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाची कहानी सांगितली होती. ते म्हणाले होते की, मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी भोईवाडा मेटल मार्केटमध्ये ८ बाय ९ फूटाचं ऑफिस भाड्याने घेतले. त्याठिकाणी मेटलचं भंगार विकण्याचं काम सुरू केले. आज वेदांता ग्रुप मार्केट कॅपिटलायझेशन तब्बल १ लाख ४१ हजार कोटींचे आहे.
केवळ जेवणाचा डबा अन् काही सामान घेऊन मुंबईत पोहचले
कोट्यवधी लोकं मुंबईत त्यांचे नशीब आजमवण्यासाठी येत असतात. मी पण त्यातलाच एक. मला आठवतं की, ज्यादिवशी मी बिहार सोडलं तेव्हा माझ्या हातात केवळ एक टिफिन बॉक्स आणि अंथरूण होतं. त्यासोबत माझ्या डोळ्यात स्वप्न होतं. सीएसटी स्टेशनला उतरलो तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा काळी-पिवळी टॅक्सी पाहिली. डबल डेकर आणि सिटी ऑफ ड्रीम्स पाहिलं. सर्व गोष्टी मला सिनेमासारख्या वाटत होत्या असा अनुभव अनिल अग्रवाल यांनी शेअर केला.