निकेत पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्कतळेरे : आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने सन्मानित झालेला मुळ तळेरे येथील व सध्या भांडुप येथे असलेला तरुण सिव्हिल इंजिनियर गेले दीड वर्षे सातत्याने कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सेवा करत आहे. मोफत ऑक्सिमीटर, अनेक कुटुंबियांना मोफत अन्नधान्य वाटप, मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटर सेवा यासारखे अनेक सेवादायी उपक्रम विशाल कडणे (Vishal Kadane) यांनी स्वतःच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे मोडून राबवले. आता पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना भांडुप येथील समाज सेवक विशाल कडणे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मिस टूरीसम युनिव्हर्स 2021 श्रिया परब (Shriya Parab) यांच्या हस्ते करण्यात आली.
कोव्हीडमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कमावत्या पालकांनी प्राण गमावले त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. अशा अनेक कुटुंबीयांनी विशाल कडणे यांना संपर्क साधून त्यांच्या पाल्यांच्या फीचा आर्थिक प्रश्न मांडला. या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन विशाल कडणे आणि त्यांचे सहकारी आज अनेक विद्यार्थ्यांची फी स्वतः पुढाकार घेऊन भरत आहेत. पालक गमावलेला एक ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ह्या ध्येयाने झपाटलेल्या विशाल कडणे आणि टीमने भांडुप येथे मिस टुरिसम युनिव्हर्स 2021 विजेती श्रिया परब हिच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांच्या चालू टर्मच्या फी रकमेचे चेक अदा केले.
आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांची फी अदा केली असून हा मदतीचा रथ अविरत सुरु राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेचं पुढाकार घ्यावा असे आवाहन विशाल कडणे यांनी केले आहे. त्यांच्या संस्थेच्यावतीने 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. चेंबूर-मानखुर्द ते मुलुंड येथील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश आहे. कोरोनामुळे ज्यांनी आपला कमावता पालकाचा छत्र गमावला आहे अशांसाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला आम्ही पन्नास विद्यार्थ्यांची निवड केली आहे असे विशाल कडणे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी आनंद जगन्नाथ पेडणेकर, विजय कडणे, गौरव पोतदार, डॉ प्रमोद जाधव, सुखदा कडणे, विजय कडणे, शिरीष देवरुखकर, वैभव भुर्के इत्यादी मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे.