मुंबई - शॉप क्लूज आणि ड्रूम सारख्या यशस्वी स्टार्टअपचे फाऊंडर संदीप अग्रवाल यांची कहाणी ऐकून कुणालाही प्रेरणा (Inspirational Stories) मिळू शकते. संदीप अग्रवाल यांना इनसायडर ट्रेडिंगच्या आरोपाखाली अमेरिकेत एफबीआयकडून अटक झाली होती. त्यानंतर पुढचे काही महिने ते तुरुंगात होते. पुढे त्यांची पत्नी आणि पार्टनर राधिका हिच्यासोबत मतभेद होऊन घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांचा पहिला स्टार्टअप विकला गेला. मात्र अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. तसेच त्यांनी ४१ व्या वर्षी एक नवे Droom हे स्टार्टअप सुरू केले. ते आज यूनिकॉर्न बनले आहे. (Sandeep Agarwal started a successful Droom.in)
यूनिकॉर्न त्या स्टार्टअपला म्हणतात ज्यांचं व्हॅल्युएशन एक अब्ज डॉलर (सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपये)च्या पुढे असतं. आज संदीप अग्रवाल यांनी स्थापन केलेलं स्टार्टअप Droom भारतामध्ये वापरलेल्या गाड्यांची खरेदी विक्री कपण्यासाठीचे एक प्रसिद्ध नाव बनलेले आहे.
संदीप अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटमध्ये अॅनॅलिस्ट होते. त्यानंतर ते टेक आंत्रप्रेन्योन बनले. त्यांना भारतामध्ये दोन यशस्वी युनिकॉर्न स्टार्टअप उभी करण्यसाठी ओळखले जाते. त्यांच्या या प्रवासामध्ये खूप चढ-उतार, मान-अपमान, भावनात्मक संघर्ष, अपयश, कौटुंबिक संकट सर्वकाही आहे. परिस्थितीसमोर हार न मानणाऱ्या उद्योजकांपैकी ते एक उद्योजक आहेत.
संदीप अग्रवाल यांनी २०११ मध्ये पत्नी आणि एका मित्रासोबत मिळून अमेरिका आणि भारतामध्ये ई-कॉमर्स कंपनी ShopClues सुरू केली. ही कंपनी खूप यशस्वी ठरली आणि यूनिकॉर्न बनली. मात्र नंतर पत्नी आणि बिझनेस पार्टनर राधिका हिच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे त्यांना या व्यवसायातून बाहेर पडावे लागले. ही कंपनी विकली गेली. तसेच पत्नी राधिका हिच्यासोबत असलेले त्यांचे नातेही तुटले.
त्यानंतर २०१३ मध्ये इनसायडर ट्रेडिंगच्या कथित आरोपाखाली त्यांच्यावर अमेरिकेत खटला दाखल झाला. तसेच त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यामुळे त्यांना ShopCluesच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र काही महिन्यातच त्यांची सुटका झाली. तसेच त्यांच्यावर लावलेले आरोपही मागे घेण्यात आले. या घटनेनंतरही त्यांनी हार मानली नाही. २०१४ मध्ये त्यांनी ऑटोमोबाईलसाठी एक ऑनलाईन मार्केटप्लेस Droom (Droom.in) सुरू केले. ते आता यूनिकॉर्न बनले आहे.