नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील आयुषी सिंहनेही उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (UPPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आयुषीच्या यशानं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. पण, वडिलांच्या हत्येचं दु:ख आयुषीला अजूनही सतावत आहे. वडिलांचा मारेकरी फरार आहे. वडिलांच्या हत्येवेळी अधिकारी होण्याचे स्वप्न तिच्या मनात रुजले होते, ते आयुषी सिंहने अखेर ते पूर्ण केले. आयुषीने मुरादाबादच्या डिलारीचे माजी ब्लॉक प्रमुख योगेंद्र सिंह उर्फ भुरा यांच्या कुटुंबाची ओळख बदलली आहे.
योगेंद्र सिंह भुरा यांच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. पण, आता या कुटुंबाची ओळख डीएसपी आयुषी सिंह यांचं कुटुंब अशी होणार आहे. आयुषी सिंह यूपीपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डीएसपी झाली आहे. वडिलांना मला अधिकारी बनवायचे होते. माझ्या वडिलांचे हे स्वप्न होतं असं आयुषीनं सांगितले. आयुषीची आई पूनम सध्या डिलारीच्या ब्लॉक प्रमुख आहेत. भुरा याच्यावर खुनासह अनेक गुन्ह्याचा आरोप होता. २०१५ मध्ये एका खटल्यात हजर राहण्यासाठी तुरुंगातून न्यायालयात आणलेल्या भुराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
भुरा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आदित्य सिंह आयआयटी दिल्लीतून एमटेक करत आहे. मुलगी आयुषीने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. भुराचे कुटुंब मूळचे भोजपूरच्या मानपूर गावचे आहे. आयुषी दिल्लीत राहते. दिल्ली राहून आयुषीने यूपीपीएससीची तयारी केली. मी अधिकारी व्हावे अशी वडिलांची नेहमीच इच्छा होती. त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले आहे असं ती म्हणाली. वडिलांनी आमच्या अभ्यासासाठी मुरादाबादच्या आशियाना येथे घर बांधले आहे. त्यांच्या हत्येनंतरच मी अधिकारी व्हायचे ठरवले होते. यासाठी UPPSC ची तयारी केली.
आयुषीने मुरादाबादच्या केसीएम स्कूलपासून हायस्कूलपर्यंत शिक्षण घेतले आहे. येथून तिने बारावीची परीक्षा दिली. यानंतर ती दिल्लीला गेली. दिल्ली विद्यापीठातून २०१९ मध्ये पदवी उत्तीर्ण केली. २०२१ मध्ये तिने राज्यशास्त्रात एमए पूर्ण केले. नेट परीक्षेत बसली आणि तेथेही यश मिळवले. गेल्या दोन वर्षांपासून ती यूपीपीएससीच्या तयारीत व्यस्त होती. अखेर या परीक्षेतही आयुषी यशस्वी झाली. आयुषीने तिच्या आईला फोन करून निकाल सांगितला. तेव्हा घरचे खुश झाले, आई म्हणाली, तू तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेस असं सांगत ती भावूक झाली.
मुरादाबाद येथील न्यायालयाच्या आवारातच योगेंद्र सिंह उर्फ भुराची हत्या करण्यात आली होती. आरोपी सुमितने २३ फेब्रुवारी २०१५ रोजी भुराला गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर वकिलांनी सुमितच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यावेळी सुमित पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, नंतर त्याला पोलिसांनी पकडले. मात्र, न्यायालयात हजेरी लावत असताना सुमितने पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देऊन पळ काढला. पोलिसांनी सुमितवर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भुरा याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर भाचा रिंकू सिंहच्या हत्येचाही आरोप होता. २०१५ मध्ये भुराची हत्या झाली तेव्हा आयुषी ११ वीत शिकत होती.