नवी दिल्ली - जर कुणाला विचारले की, जगातील सर्वात मौल्यवान वस्तू काय आहे, तर कुणीही हिरा किंवा सोने यांचंच नाव घेईल. मात्र सोने आणि हिऱ्यापेक्षाही एक लाकूड अधिक मौल्यवान आहे, असे सांगितले तर तुमचा क्षणभर त्यावर विश्वास बसणार नाही. जरी विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. जगातील या सर्वात दुर्मीळ लाकडाची किंमत ही हिरे आणि सोन्यापेक्षाही अधिक आहे. आज आपण त्या लाकडाबाबत जाणून घेऊयात. (Agarwood is the rarest wood in the world, with gold and diamonds costing nothing)
अकिलारियाच्या झाडापासून मिळणारे लाकूड अगरवूड, ईगलवूड किंवा एलोसवूड या नावाने ओळखले जाते. हे लाकूड चीन, जपान, भारत, अरबस्थान आणि दक्षिणपूर्वी आशियामध्ये सापडते. अगरवूडचे लाकूड हे जगातील सर्वात दुर्मीळ आणि सर्वात महागडे लाकूड आहे. या लाकडाची किंमत ही सोने आणि हिऱ्यापेक्षाही अधिक आहे. आताच्या घडीला भारतात एक ग्रॅम हिऱ्याची किंमत ३ लाख २५ हजार तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७ हजार ६९५ रुपये आहे. मात्र अगरवूडच्या केवळ १ ग्रॅम लाकडाची किंमत ही १० हजार डॉलर म्हणजेच ७ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
अगरवूड हे लाकूड जपानमध्ये क्यानम किंवा क्यारा या नावाने ओळखले जाते. या लाकडापासून अत्तर आणि परफ्युम बनवला जातो. लाकूड कुसल्यानंतर त्याचा वापर अत्तर बनवण्यासाठी केला जातो. एवढेच नाही तर अगरवूडच्या लाकडाच्या राळेपासून ओड तेलही मिळवले जाते. हे तेल सेंटमध्ये वापरले जाते. आजच्या घडीला या तेलाची किंमत २५ लाख रुपये प्रति किलो एवढी आहे. एवढे मौल्यवान असल्याने अगरवूडला वूड ऑफ गॉड्स म्हणजेच देवाचे लाकूड असे म्हणतात.
हाँगकाँग, चीन, जपानमध्ये अकिलारियाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र यामधून निघणारे अगरवूड एवढे मौल्यवान असल्याने या वृक्षांची तोड आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे अकिलारियाच्या वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार एशियन प्लांटेशन कॅपिटल कंपनी अकिलारियाच्या वृक्षांशी संबंधित आशियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. ती झाडांच्या प्रजाती वाचवण्याच्या कामामध्ये गुंतलेली आहे. तसेच या कंपनीने हाँगकाँगसह अनेक देशांत वृक्षारोपनाचे काम केले आहे.