मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून जगही जिंकता येऊ शकतं हे मराठमोळ्या अमृतानं दाखवून दिलं आहे. कोल्हापूर येथील अमृता विजयकुमार कारंडे हीनं आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर जागतिक स्तरावली एका मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळवली आहे. अमृताचे वडिल हे एक रिक्षाचालक आहेत. अमृतासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं तिनं चीज करून दाखवलं.
अमृता ही सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तिचे वडिल रिक्षाचालक तर आई एक गृहिणी. मोठं स्वप्न उराशी बाळगून अमृतानं मेहनत करण्यास सुरूवात केली आणि तिच्या मेहनतीला मोठं यशही आलं. संगणक शास्त्रातील तिची गुणवत्ता पाहून सर्वाच्या परिचयाची असलेल्या आणि जागतिक दर्जाच्या अडोब या कंपनीत तिला नोकरीची संधी मिळाली आहे. कंपनीनं तिला तब्बल ४१ लाख रूपयांची प्री प्लेसमेंट ऑफर केली आहे. तिच्या या यशाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. सध्या ती केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिग आणि प्लेसमेंट विभागाच्या संगणकशास्त्र विभागात शिकत आहे.
केआयटी महाविद्यालयात अडोबकडून कोडींग स्पर्धेचं आयोजन करम्यातालं होतं. या स्पर्धेत यश मिळवलेल्या अमृताला नंतर कंपनीनं आपल्याकडे २ महिन्यांच्या इंटर्नशीपसाठी बोलावलं होतं. त्यासाठी तिला महिन्याला १ लाख रूपये शिष्यवृत्तीही कंपनीनं दिली. यादरम्यान, तिनं आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आणि या कालावधीत घेण्यात आलेल्या काही परीक्षांदरम्यान तिनं उत्तम कामगिरीही केली. यानंतर अडोब या कंपनीनं अमृताला प्री प्लेसमेंटद्वारे नोकरीची संधी दिली. यासाठी तिला ४१ लाख रूपयांचं पॅकेजही ऑफर करण्यात आलं आहे.