लंडन : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या २६ वर्षांच्या एका मूळ भारतीय युवकाने महात्मा गांधीजींच्या लंडनमधील संसद चौकातील पुतळ्यासाठी १ लाख पौंडाचे दान केले असून, तो सर्वांत लहान वयाचा दाता ठरला आहे. नाईन हॉस्पिटॅलिटी लि. या कंपनीचा संचालक व ब्रिटनमधील रिअल इस्टेट विकासक विवेक चढ्ढा याने ही देणगी दिली आहे. विवेक चढ्ढा यांनी आपण गांधीजींचे अनुयायी असल्याचे सांगितले. २०१० साली लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअर झालेले विवेक चढ्ढा गांधीजींचे अभ्यासक आहेत. महात्मा गांधीजींनी नेहमी दानावर भर दिला व दया हे तत्त्व आचरणात आणले. गांधीजींनी आपली सर्व ऊर्जा इतरांची सेवा करण्यासाठी खर्च केली, तरुणांनी दैनंदिन जीवनात अनुकरण करण्यासाठी हे फार मोठे उदाहरण आहे, असे चढ्ढा म्हणतात. विवेकसारख्या तरुणांनी या कामासाठी मदत करण्यास पुढे आले पाहिजे. या पुतळ्यासाठी देणगी देणाऱ्या ब्रिटिश आशियन लोकांत आता विवेकचा समावेश झाला आहे, असे अर्थतज्ज्ञ मेघनाद देसाई यांनी म्हटले आहे. गांधी पुतळा स्मारक ट्रस्टचे ते संस्थापक आहेत. गांधीजींच्या या स्मारकासाठी संपूर्ण जगातून मदत येत आहे, असे देसाई म्हणाले.
गांधीजींच्या पुतळ्यासाठी १ लाख पौंडाचे दान !
By admin | Published: February 02, 2015 1:17 AM