दररोजच्या रहाटगाडग्यातून काहीशी उसंत मिळावी म्हणून लोक फिरायला जातात. विरंगुळ्याचे, आनंदाचे चार क्षण मिळावेत यासाठी अनेक जण आवडत्या ठिकाणी फिरून येतात. शहरातील बहुतांश तरुणाई रिसॉर्टला जाऊन मजा करते. मात्र कधीकधी आनंदाच्या क्षणांना गालबोट लागतं. इंडोनेशियाच्या केनपार्क वॉटर पार्कमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.
वॉटर पार्कमधील वॉटर स्लाईड अचानक तुटली आणि अनेकजण वरून थेट खाली कोसळले. यामध्ये १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्लाईडवरून अनेकजण खाली येत असताना हा प्रकार घडल्याचं वृत्त इंडोनेशियातील वृत्तसंस्था अंतरानं दिलं. वॉटर स्लाईड मोडली आणि १६ जण खाली पडले. सर्वच्या सर्व १६ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेचा व्हिडीओ फेसबुकवर NOODOU नावाच्या पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये वॉटर स्लाईड तुटताना स्पष्ट दिसत आहे. स्लाईडच्या कोपऱ्याला भेग पडली होती. त्यातच स्लाईडवर लोकांनी गर्दी केली. अधिक वजन आल्यानं स्लाईड तुटली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.