प्योंगयांग : उत्तर कोरियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० लाखावर पोहोचली असून, सोमवारी तिथे या आजाराने आणखी आठ जण मरण पावले. कोरोनावर उपचारासाठी औषध पुरवठा करण्यास अधिकारी विलंब लावत असल्याबद्दल त्या देशाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी आता लष्करालाच मैदानात उतरविण्याचा किम जाँग उन यांचा विचार आहे.
या देशात तीन लाख लोकांना कोरोनासदृश संसर्गाची लक्षणे असून, त्यांची तपासणी झाल्यानंतर नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडणार आहे. ओमायक्राॅन विषाणूच्या प्रसारामुळे असंख्य लोक आजारी पडल्याचे उत्तर कोरियाने म्हटले होते. मात्र हा देश जी आकडेवारी सांगत आहे, त्यापेक्षा तिथे कितीतरी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उत्तर कोरियामध्ये कोरोनावर कोणतीही प्रतिबंधक लस सध्या उपलब्ध नाही. त्यांच्याकडे चाचण्यांचे संच तसेच उपचारासाठी लागणाऱ्या इतर साधनांचाही तुटवडा आहे. या देशाला चीन कोरोना लस देऊ करीत होता, पण किम जाँग उन यांनी त्याला नकार दर्शविला. उत्तर कोरियात पहिला रुग्ण सापडल्याचे काही दिवसापूर्वी किम यांनी मान्य केले.