फनोम पेंच (कंबोडिया) : वैद्यकीय शिक्षणाचे कुठलेही सर्टिफिकेट नसताना गावकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन एका गावात प्रॅक्टिस करणाऱ्या एका मुन्नाभाई अर्थात भोंदू डॉक्टरमुळे तब्बल १०० जणांना एडस् झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या आरोपीला मंगळवारी न्यायालयात आणण्यात आले होते.येम क्रिन (वय ५३)असे या भोंदू डॉक्टरचे नाव असून त्याला मागील डिसेंबरमध्येच अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येसह इतर तीन आरोप लावण्यात आले आहेत. रोका या गावात ग्रामस्थांचा विश्वास संपादन करून तो वैद्यकीय व्यवसाय करीत होता. ज्या व्यक्तींना एडस् झाला आहे त्यांचे वय ३ ते ८२ वर्षांपर्यंत आहे. कंबोडिया हा जगातील गरीब देशांपैकी एक देश असून ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ अशा भोंदू डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. पीडितांपैकी एक लिअर्न लम हे म्हणाले की, एडस् झाल्याचे ऐकून मला धक्काच बसला. ज्या १२० ग्रामस्थांनी या डॉक्टरची तक्रार केली आहे त्यापैकी लिअर्न लम हे एक आहेत. या आरोपीला शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)सिरिंजच्या पुनर्वापरामुळे झाला प्रसार?रुग्णाला इंजेक्शन दिल्यानंतर सिरिंज स्वच्छ न करता हा भोंदू डॉक्टर दुसऱ्या रुग्णाला याच सिरिंजने इंजेक्शन देत होता. ८०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी त्याच्याकडून उपचार करून घेतले आहेत. यापैकी १०० जणांना एडस्ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. एडस्बाधित रुग्णांची संख्या ३०० पेक्षा जास्त असल्याचा दावा येथील दैनिकाने केला आहे.
भोंदू डॉक्टरमुळे १०० जणांना एडस
By admin | Published: October 21, 2015 2:20 AM