न्यू यॉर्क : अनेक वर्षांपासून बर्म्युडा ट्रँगल हे जगासाठी एक रहस्य राहिले आहे. आजपर्यंत बर्म्युडा ट्रँगलमध्ये अनेक विमाने आणि जहाजे बेपत्ता झालीत. वर्षानुवर्षे संशोधन करूनही शास्त्रज्ञांना त्याचे रहस्य उलगडता आलेले नाही. पण, आता अमेरिकास्थित ट्रॅव्हल एजन्सीने बर्म्युडा ट्रँगलच्या प्रवासासाठी एक विचित्र ऑफर आणली आहे.
अटलांटिक महासागरात बार्बाडोस, फ्लोरिडा आणि प्युर्टो रिकोदरम्यान ५ लाख चौरस किलोमीटरचा बर्म्युडा ट्रँगल हा पट्टा येतो. अमेरिकी ट्रॅव्हल एजन्सी एन्शियंट मिस्ट्रीज क्रूझने ही ऑफर जाहीर केली आहे. आमची क्रूझ बर्म्युडा ट्रँगलची सफर करुन परत येईल आणि जर जहाज बेपत्ता झालेच तर एजन्सीकडून पूर्ण रिफंड मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुढील वर्षी मार्चमध्ये प्रवासी नॉर्वेजियन प्राइमा लाइनरने न्यूयॉर्क ते बर्म्युडा असा प्रवास करतील. हा ५ दिवसांचा प्रवास असेल आणि यासाठी प्रवाशांना एका केबिनसाठी सुमारे १,४५० पाऊंड म्हणजे सुमारे दीड लाख रुपये मोजावे लागतील. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या ही विचित्र ऑफर व्हायरल झाली असून नेटकरी चांगलेच हैराण झालेत. बेपत्ता झाल्यास परतावा तरी कोणाला देणार, अशा प्रतिक्रिया येत आहेत.
बर्म्युडा ट्रँगलच्या या प्रवासात बेपत्ता होण्याची काळजी करु नका. तुम्ही बेपत्ता झाल्यास शंभर टक्के परतावा मिळेल, अशी जाहिरात त्यांनी वेबसाइटवर दिली आहे. यासोबतच बेपत्ता होण्याची शक्यता दुर्मिळ आहे असेही नमूद करण्यात आले आहे.