कॅनडाच्या टोरंटोमध्ये एका म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडीओबाहेर १०० च्या वर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या आणि कॅनडासोबतचा भारताचा वाद या गोष्टी ताज्याच असताना ही घटना घडल्याने पंजाबी गायकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोमवारी रात्री ही घटना घडल्याचे कॅनडाच्या पोलिसांनी सांगितले आहे. एका अज्ञात चोरीच्या वाहनातून आलेल्या लोकांनी रायफलमधून या स्टुडिओच्या आजुबाजुला असलेल्या लोकांवर गोळ्या झाडल्या. यात कोणी जखमी झालेले नसले तरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत २३ लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन अस़ॉल्ट रायफलसह १६ शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
पंजाबी गायक, संगीतकारांचे या भागात स्टुडिओ आहेत. टोरंटो पोलिसांनी या भागात सर्च ऑपरेशन राबविले, तेव्हा त्यांना या स्टुडीओ आणि इमारतींमधून मोठ्या संख्येने बंदुका, बॉम्ब लपविलेले सापडले आहेत. या हल्लेखोरांचाही पोलिसांनी काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतू, त्यापैकी एकच ताब्यात घेता आला आहे. उर्वरित दोघे पसार झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यावेळी पोलीस साध्या वाहनातून तिथे एका प्रकरणाच्या चौकशीसाठी आले होते. त्यांच्याही वाहनावर या हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यातून पोलिसही वाचले आहेत, असे टोरंटो पोलिसांनी सांगितले.