मुंबई - चीननंतरइटलीमध्येकोरोनाचा कहर काढू लागला असून तिथे 400 हून जास्त नागरिक संक्रमित झाले आहेत. तर उद्रेक रोखण्यासाठी अनेकांना घरातच राहण्याचे सांगण्यात आले आहे. भारतातही कोरोनाने संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली असून केरळमध्ये एका तीन वर्षांच्या बालकालाही लागण झाल्याचे समोर आले आहे. जगभरातील 101 देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर, चीनमधील एका 100 वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात दिली.
कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत 3661 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवसात 1752 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, त्यापैकी 89 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जवळपास 80 हजार कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी 3000 जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याची माहिती आहे. जगभरात 1 लाख 07 हजार 802 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
चीनमध्ये हळू हळू कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. तेथील 100 वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात दिली. कोरोनाग्रस्त या आजोबाने कोरोनाला पळवून लावलं आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनामुळे चीनमधील व्यापार आणि बाजारापेठेत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये चीनमधून होणाऱ्या निर्यातीवर 17.02 टक्के घसरण झाली आहे. तर आयात होणाऱ्या व्यापारातही 4 टक्के कमतरता आली आहे.