व्हँकूव्हर (कॅनडा) : अलीकडेच संपलेल्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीवर टीका होत असताना १०० वर्षांच्या एका भारतीय आजीने धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावून वाहवा मिळविली!‘अमेरिकाज मास्टर्स गेम्स’ या ज्येष्ठ नागरिकांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये मूळच्या चंदिगडच्या असलेल्या मान कौर या वयाची शंभरी गाठलेल्या महिलेने ही करामत केली. त्यांनी १०० मीटर धावण्याची शर्यत दीड मिनिटात पूर्ण केली. त्यांच्या वयोगटातील या शर्य तीत उतरलेल्या त्या एकमेव स्पर्धक होत्या. तरीही ती अधिकृतपणे शर्यत मानली गेली व मान कौर यांना सुवर्णपदक देण्यात आले.मुलगा गुरुदेव सिंग याच्या आग्रहाखातर मान कौर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली व जगात विविध शहरांमध्ये झालेल्या अशा स्पर्धांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत २० पदके पटकावली आहेत. या वयातही मान कौर यांचा उत्साह व जिद्द तरुणांनाही स्फूर्ती देणारा आहे. माझी आई जेव्हा या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला तयार झाली तेव्हाच ती नाव कमावणार याची आपल्याला खात्री होती, असे गुरदेव सिंग यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)