कोणत्याही घरात मूल जन्माला येणं म्हणजे किती आनंदाची गोष्ट! तो एक मोठा साेहळा असतो आणि आईसाठी तर तो अतिशय संस्मरणीय असा क्षण असतो. आपल्या बाळाला कुठे ठेवू अन् कुठे नको असं तिला झालेलं असतं. तिच्या दृष्टीनं आपलं बाळ जगातलं सर्वांत सुंदर बाळ असतं. बाळ जन्माला आल्याबरोबर त्याच्या सुखी आयुष्याची, भविष्याची स्वप्नं पाहायला आणि त्या दृष्टीनं लगेचंच प्रयत्न करायलाही सुरुवात होते. पण, नुकत्याच जन्माला आलेल्या याच बाळावर जर त्या मातेला स्वत:च्या हातांनी अंतिम संस्कार करावे लागत असतील तर? त्या मातेवर किती आघात होत असेल, याची कल्पना कोणालाच स्वप्नातही करता येणार नाही. पण असं होतंय खरं..
बरं अशा अभागी माता तरी किती असाव्यात? एकाच गावातल्या, एकाच परिसरातल्या आतापर्यंत सुमारे दहा हजार मातांवर असा प्रसंग गुदरलाय. आणि किती कालावधीत हे मृत्यू झाले असावेत? तर तेही फक्त पाच ते साडेपाच महिन्यांत! हे प्रसंग आता तरी थांबलेत का? तर तेही नाही! मृत्यूची ही घंटा अजूनही घणघणतेच आहे आणि त्यात हजारो बालकं, माता मृत्युमुखी पडताहेत!
अन्नाच्या पाकिटांवरून वातावरण तंगअन्नाची ही जी पाकिटं हवाईमार्गानं गाझा पट्टीत टाकली जात आहेत, त्यावरूनही आता वातावरण तंग झालं आहे. हमासचं म्हणणं आहे, ही पाकिटं आकाशातून का फेकता? जमीनमार्गेच पाठवा. अमेरिका आणि इतर देशांचं म्हणणं आहे, जमीनमार्गे मदत पोहोचवणं तर आम्हाला जास्त सोपं आणि स्वस्तही आहे, पण इस्रायलनं मार्ग अडवून ठेवलेत. इस्रायलचं म्हणणं आहे, आम्ही मार्ग अडवलेले नाहीत, हमासच मधल्या मध्ये अन्नाच्या ट्रकची लुटालूट करतंय!
अर्थातच सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा पट्टीत जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धाची ही परिणिती! सात ऑक्टोबरला हे युद्ध सुरू झालं आणि तेव्हापासून मृत्यूचं हे रणशिंग तिथे वाजतंच आहे. अधिकृत आकडेवारीनुसार गाझा पट्टीत आतापर्यंत सुमारे ३१ हजार निरपराध नागरिक मारले गेलेत; पण तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे, हा आकडा त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. मृतांमध्ये महिला आणि बालकांची संख्या सर्वांत जास्त म्हणजे सुमारे ७५ टक्के इतकी आहे.
या हल्ल्यात ज्या गर्भवती महिला मृत झाल्या, त्यांच्या पोटातील बाळांची तर यात नोंदही नाही. सरकारी आकडेवारीनुसार गाझा पट्टीत आजच्या घडीला सहा हजारपेक्षाही अधिक महिला येत्या दहा ते पंधरा दिवसांत बाळाला जन्म देणार आहेत. काही महिलांची डिलिव्हरी डेट अजून थोडी लांब आहे. तिथली आजची परिस्थिती अशी आहे की, लोकांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, जिकडे पाहावं तिकडे फक्त मृत्यूचा सडा, लोकांच्या मरणप्राय किंकाळ्या आणि मृत्यूची प्रतीक्षा! अशात आपल्या बाळांचं काय होणार या चिंतेनं या मातांचा जीव अक्षरश: कासावीस झाला आहे. आपली स्वत:चीच वाचण्याची शक्यता नाही, तिथे या बाळांना जन्माला घालून आणि त्यांना यमाच्या दारात सोडून आपण खूप मोठं पातक केलंय अशीच अनेक महिलांची भावना आहे. आपल्या पश्चात आपल्या बाळाचे हाल होऊ नयेत आणि मरणप्राय यातनांनी त्यानं रस्त्यावरच प्राण सोडू नयेत म्हणून काही मातांनी तर आत्महत्येचाही मार्ग पत्करलाय! संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीनंही यावर अतिशय गंभीर चिंता व्यक्त करताना हे युद्ध लवकरात लवकर संपावं आणि निरपराधांचा जीव वाचावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
संपूर्ण गाझापट्टीतले लोक सध्या अनंत हालअपेष्टांतून जात आहेत. काहीही केलं तरी त्यांच्यासमोर चोहोबाजूनं फक्त मृत्यूच उभा आहे. तिथल्या लोकांनाही वास्तव समोर दिसतंय.. एकतर दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या क्षेपणास्त्रं आणि बॉम्बहल्ल्यात आपला मृत्यू होईल, नाहीतर वेदना आणि जखमांनी मृत्यू होईल, अन्यथा अन्नपाण्यावाचून तडफडून मृत्यू होईल.. हे कमी की काय, म्हणून सध्या विविध देशांतून इथल्या लोकांच्या मदतीसाठी पॅराशूटद्वारे खाद्यपदार्थांचे जे मोठमोठे बॉक्सेस खाली टाकले जात आहेत, त्यातलं काहीतरी आपल्याही वाट्याला यावं म्हणून जीव तोडून पळताना त्यांच्याच अंगावर ते बॉक्सेस पडून काही जण ठार झाले आहेत!
पॅराशूटमधून टाकलेले अन्नाचे बॉक्सेस जिथे जिथे पडलेत, तिथे तिथे क्षणार्धात मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे लोक गोळा होताहेत, त्या बॉक्सेसवर तुटून पडताहेत. तिथल्या मारामाऱ्या आणि चेंगराचेंगरीमुळेही काही मुलं आणि वृद्ध ठार झाले आहेत. यापेक्षाही दुर्दैवी म्हणजे पॅराशूटमधून टाकलेले हे फूड पॅकेट्स काही वेळा चुकीनं तिथल्या भूमध्य समुद्रातील किनाऱ्याजवळच्या पाण्यात पडले. त्यासाठी लोकांनी चक्क समुद्रातच उड्या मारल्या आणि त्यातही काही जण बुडून मेले! गाझा पट्टीत सध्या अशी सगळी अनागोंदी सुरू आहे.