तेल अवीव : इस्रायल व हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे संपूर्ण गाझा शहराला वेढा घातला. हमासचा वरचष्मा असलेल्या गाझा शहराच्या उत्तर भागाचा तेथील अन्य भागांशी संपर्क तोडण्यात आला. इस्रायली सैन्य गाझा शहरात कोणत्याही क्षणी प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे खूप मोठा संहार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गाझात इस्रायल सैन्याने प्रवेश केल्यास त्यांच्याशी कडवी झुंज देण्याचे हमासने ठरविले आहे. त्या शहरातील लोक इस्रायली सैन्याशी लढण्याकरिता रस्त्यावर उतरणार आहेत, असे हमासने म्हटले आहे. त्यामुळे मृत व्यक्ती व जखमींच्या संख्येतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इस्रायलने कोंडी केल्यामुळे गाझामध्ये इंधन, औषधी, अन्नधान्य अशा जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तेथील शाळांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अख्यत्यारीतील संघटनांनी मदत छावण्या सुरू केल्या आहेत. (वृत्तसंस्था)
पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चापश्चिम आशियातील चिंताजनक स्थिती व इस्रायल-हमास संघर्षाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रईसी यांच्याशी सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. दहशतवादी हल्ले, हिंसाचार व निरपराध व्यक्तींचे होत असलेले मृत्यू याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एका पत्रकात म्हटले आहे की, युद्धग्रस्त भागातील नागरिकांना मानवतावादी दृष्टिकोनातून जीवनावश्यक गोष्टींची मदत पुरविणे, शांतता या गोष्टींवर मोदी व रईसी यांनी भर दिला आहे.
अमेरिकेची आण्विक पाणबुडी तैनातअमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या कमांडसाठी आण्विक पाणबुडी पाठवली आहे. ओहायो प्रकारच्या पाणबुड्या अण्वस्त्रांनी सुसज्ज आहेत. मध्यपूर्वेत, भूमध्य समुद्र, लाल समुद्र, पर्शियन गल्फ आणि ओमानच्या आखातात अमेरिकेची कमांड आहे. मात्र, अण्वस्त्र पाणबुडी कुठे तैनात करण्यात आली आहे, हे अमेरिकन लष्कराने सांगितले नाही. अमेरिकेच्या या कृतीने अरब देश संतापले आहेत.
युद्धविरामाची अमेरिकेची सूचना फेटाळलीमानवतेच्या दृष्टिकोनातून युद्धविराम घेण्याची अमेरिकेची सूचना इस्रायलने फेटाळून लावली आहे. हमासने ओलिस ठेवलेल्या २४० जणांची तत्काळ मुक्तता करावी अशी मागणीही इस्रायलने केली होती. जॉर्डन, इजिप्त यांनी वारंवार इशारे देऊनही इस्रायल गाझातील कारवाई थांबविण्यास राजी नव्हता.