कहरामनमारस (तुर्की) : तुर्कीत मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, इस्केंडरनमध्ये मदतकार्यात ढिगाऱ्याखाली १०१ तास राहिलेल्या सहा लोकांना शुक्रवारी सकाळी जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.
तुर्कीतील मृतांची संख्या २२ हजारांच्या वर गेल्याचे सांगण्यात येत आहे. दहा शहरांमध्ये दहा हजार इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, तर एक लाख इमारतींचे नुकसान झाले आहे. एका इमारतीखालून एका मुलाला शुक्रवारी बाहेर काढण्यात आले, तेव्हा नातेवाइकांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले. एका इमारतीच्या ढिगाऱ्यातून सहा लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले. युद्धग्रस्त सीरियात ३३०० लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २१,६०० झाली. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोआन यांनी भूकंपग्रस्तांना एक वर्षात घर व ५३२ डॉलरची मदत जाहीर केली.
भारतीय महिलासैनिकाचे तुर्कीतील महिलेने मानले आभार तुर्कीत बचाव आणि मदत पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या महिलासैनिकाचे चुंबन घेत असलेल्या तुर्की महिलेचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. भारतीय लष्कराच्या अतिरिक्त महासंचालनालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यात म्हटले आहे की, आम्ही काळजी घेतो.
लष्कराच्या या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुक केले आहे. ते युद्धासाठी नाहीत, पण स्वतःच्या देशातील लोकांचे आणि इतर गरजू देशांचे रक्षण करण्यासाठी आहेत. टीमला खूप खूप शुभेच्छा, असे एका युजरने म्हटले आहे.
‘ऑपरेशन दोस्त’चा एक भाग म्हणून भारतीय लष्कराने वैद्यकीय साहित्य, एक फिरते रुग्णालय मदतीसाठी पाठविले आहे.