रोम - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. यातच एक आनंदाची बातमी आली आहे. आतापर्यंत कोरोनाचा सर्वाधिक परिणाम वृद्धांवर होतो, असा समज होता. मात्र आता आलेल्या या बातमीमुळे वृद्धदेखील कोरोनापासून बरे होऊ शकतात, असे म्हटले जाऊ शकते. ही बातमी आहे इटलीतील. येथील रिमिनी शहरातील तब्बल 101 वर्षांच्या एका आजोबांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या आजोबांना 'मिस्टर पी' म्हणून ओळखले जाते. कोरोनातून सावरणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. हे आजोबा कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत.
रिमिनीच्या उप-महापौर ग्लोरिया लिसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्टर पी यांचा जन्म 1919मध्ये झाला आहे. पी यांना एक आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंर त्यांना एका स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
एका वाहिनीला गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत, लिसी म्हणाल्या, “100 वर्षाच्या या आजोबांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. ते पूर्णपणे बरे झाले आहेत. हे आमच्यासाठी आशादायक आहे. आम्ही रुग्णालयात रोज दुख्खद बातम्या ऐकतो. मात्र, अशा बातमीमुळे उर्जा मिळते. वृद्ध व्यक्तींसाठी हा विषाणू जिवघेणा ठरत आहे. मात्र या आजोबांनी त्यावर मात केली आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी रुग्णालयातून घरी नेले."
इटलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 80,500 हून अधिक -
कोरोनाचा सर्वाधिक फटका चीन पाठोपाठ इटलीला बसला आहे. येथे आजपर्यंत 80,500 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर तब्बल 8,200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.