पिट्सबर्ग: अमेरिकेच्या पिट्सबर्गमध्ये शनिवारी एका प्रार्थनास्थळाबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरानं तीन पोलिसांवरही गोळीबार केल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका यहुदी प्रार्थनास्थळाबाहेर हा हादरवून टाकणारा प्रकार घडला. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. आपला देश अमेरिकेसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या गोळीबारानंतर पिट्सबर्ग सुरक्षा विभागानं ट्विट करुन नागरिकांना सत्रक राहण्याचं आवाहन केलं आहे. 'विलकिन्स आणि शेडी भागात एक सक्रीय हल्लेखोर आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहावं. याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध होताच ती नागरिकांना देण्यात आली,' असं सुरक्षा विभागानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील गोळीबाराची घटना भयानक असल्याचं म्हटलं आहे. हा प्रकार अपेक्षेपेक्षा जास्त भयानक होता, असं ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी महापौर आणि राज्यपाल यांच्याशी संवाद साधला असून सरकार त्यांच्यासोबत आहे, असंदेखील त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. प्रार्थनास्थळाच्या आतमध्ये जर एखादा सुरक्षारक्षक तैनात असता, तर नागरिकांचा जीव गेला नसता, असं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.